रोहा (रायगड) : मुंबईसह कोकणात उन्हाच्या झळा व वाढत्या तापमानामुळे प्रचंड उष्णता जाणवत आहे. रोहा तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला. वरसे गावात बाजारात जात असलेल्या युवकास अचानक चक्कर आली. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दुपारच्या वेळी हा प्रकार घडला.
कमल चौहान (वय ३४) असे या युवकाचे नाव आहे. वाढते तापमान व उन्हामुळे चौहान यांना भोवळ व चक्कर आल्याचे उपस्थितांनी सांगितले. शहरात आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उष्णता वाढली आहे. येथील तापमानाचा पारा सातत्याने ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे. चौहान यांचा मृतदेह विच्छेदनासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.