महाड-रायगड मार्गावर अपघातात तरुण ठार, आई गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:57 AM2019-10-04T02:57:38+5:302019-10-04T02:57:49+5:30
महाड ते किल्ले रायगड मार्गावर नाते गावाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याची आईदेखील या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.
दासगाव : महाड ते किल्ले रायगड मार्गावर नाते गावाजवळ झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर त्याची आईदेखील या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. अपघातानंतर वाहनचालक पळून गेला. मात्र, महामार्गावर सुरू असलेल्या वाहन तपासणीत संशय आलेले वाहनच अपघातातील असल्याचे उघड झाले. वाहनचालकाला महाड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
महाड-रायगड मार्गावर नाते गावाजवळ किल्ले रायगड पाहून येणाऱ्या पर्यटकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरची आणि महाडकडून कोंझर गावाकडे जाणाºया दुचाकीमध्ये हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वार संदीप पवार (३६) हा तरुण जागीच ठार झाला, तर मागे बसलेली त्याची आई मालती पवार (५५) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना अधिक उपचारासाठी मुंबई येथे हलवले आहे.
टेम्पो ट्रॅव्हलरचालकाने अपघात झाल्यानंतर तत्काळ पळ काढला. मात्र, मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली पोलीस पथकास या अपघातग्रस्त वाहनाला ओळखण्यात यश आले. महाड शहर पोलिसांनी एक वाहन दुचाकी अपघात करून पळून गेल्याचे कळवताच टेम्पो ट्रॅव्हलरचालकाला ताब्यात घेतल्याची माहिती महामार्ग पोलीस पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. वाय. एम. गायकवाड यांनी दिली. या पथकात हेड कॉन्स्टेबल एच. सी. चव्हाण, आर. एम. पवार, एस. जी. सावंत, व्ही. व्ही. पाटील, जी. ए. भिलारे यांचा समावेश होता.