पनवेल : तरुणांनी संविधानाचे संवादक होऊन खेड्यापाड्यातील माणसापर्यंत भारतीय संविधानातील मूल्ये पोहोचवावी, तरच देशातील असंविधानिक प्रक्रियांना आळा बसेल, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी रविवारी नेरे, शांतिवन येथील कुष्ठरोग निवारण समितीच्या वतीने आयोजित संविधान प्रचारक शिबिरात व्यक्त केले.संविधान संवर्धन आणि साक्षरता अभियानांतर्गत राष्ट्र सेवा दल रायगड, मिशन माणुसकी, कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन, डॉ. पी.व्ही. मंडलिक ट्रस्ट, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, ग्राममित्र आणि युसुफ मेहेरअली सेंटर यांच्या वतीने पनवेल तालुक्यातील कुष्ठरोग निवारण समिती शांतिवन येथे दोन दिवसीय संविधान प्रचारक शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर, सामाजिक कार्यकर्ते अल्लाउद्दीन शेख, सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, साधना वैराळे, नागेश जाधव, लोकशाहीर संभाजी भगत, नीलेश खानविलकर, प्रवीण जठार आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना, मुक्ता दाभोलकर यांनी सांगितले की, संविधानातील मूल्ये ही भारतीयांच्या जगण्याचा भाग झाला पाहिजे आणि यासाठी संविधान प्रचारक शिबिरात आलेल्या प्रत्येक शिबिरार्थीने संविधानाचे ‘संवादक’ होऊन खेड्यापाड्यातील अंतिम माणसापर्यंत ही मूल्ये पोहोचवावीत, यासाठी माझ्यापासून सुरुवात करणार असल्याचे त्या म्हणाल्या.देशातील सत्ताधारी धार्मिक आणि भांडवलशाही व्यवस्थेला पूरक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखण्यासाठी संविधान प्रचारकाच्या माध्यमातून लोकचळवळ व्हावी यासाठी सुशिक्षित तरुण स्वत:हून संघटित होत आहेत, ही सकारात्मक बाब असल्याचे भूमिका सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी मांडले.
तरुणांनी संविधानातील मूल्यांबाबत जागृती करावी- मुक्ता दाभोलकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:23 AM