- गिरीश गोरेगावकरमाणगाव : समाज माध्यमांचा वापर फक्त करमणूक अगर वेळ घालविण्यासाठी केला जातो. यामुळे आज समाज माध्यमांकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला नाही. असे असले, तरी रायगड जिल्ह्यातील गोरेगांव येथील तरुणांनी व्हॉट्सअॅपचा सकारात्मक वापर करून दाखविला आहे. गोरेगांव येथील सुमारे १५० तरुणांनी व्हॉट्सअॅपवर ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप बनवून, त्या माध्यमातून सुमारे बारा लाखांची मदत गोळा केली. या मदतीतून ३५ गावांतील सुमारे ३४० वादळग्रस्त कुटुंबांना छप्पर मिळाले आहे.समाज माध्यमांचा सकारात्मक वापर करून, गोरेगांवमधील या तरुणांनी एक आदर्श निर्माण केला आहे.गोरेगांव आणि परिसरातील तरुण मुले आणि मुली नोकरी, व्यवसायानिमित्त मोठ्या शहरात वास्तव्यास आहेत. चक्रीवादळाची दाहकता त्यांना समजली आणि आपल्या जन्मभूमीसाठी काहीतरी भरीव काम करायचे, या उद्देशाने मयूर खुळे, प्रवीण मोहिते, प्रमोद सवदत्ती, महावीर जैन, शुभम भोकरे, सचिन खुळे, अनिल गवसकर, रितेश हुजरे, रोहित रातवडकर, तुषार शिंदे, केतन शाह यांसारख्या जवळपास १५० युवकांनी ‘निसर्ग सायक्लॉन सपोर्ट’ हा ग्रुप स्थापन केला आणि त्या समूहाद्वारे आपल्या अन्य मित्रांना आपल्या गावासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यातूनच राजकीय पदाधिकारी, सामाजिक संस्था यांची मदत न घेता, या ग्रुपने काम सुरू केले.प्रमोद सवदत्ती, रोहित रातवडकर, तुषार शिंदे, महावीर जैन, अनिल गवसकर, शुभम भोकरे यांनी जे गरीब आणि निराधार, गरजू आहेत, ज्यांचे छप्पर या वादळाने हिरावून घेतले, त्या घरांचा ग्राउंड लेव्हलला सर्व्हे करून संकलित केलेली माहिती या ग्रुपवर पाठविली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. ‘गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे’ या भावनेतून या तरुणांनी केलेल्या कामामुळे अनेकांना आधार मिळाला.श्रमदानावर भरआतापर्यंत ३५ गावांमधून सुमारे ३४० कुटुंबांना या ग्रुपच्या वतीने छप्पर देण्यात आले. जवळपास बारा लाख रुपये खर्च करीत, १२,५०० कौले, ८ हजार कोने, ११०० सिमेंट पत्र्यांची मदत घरपोच झाली. त्यातून जे अत्यंत निराधार आहेत आणि कमावते नाहीत, अशा कुटुंबांच्या घरावर ग्रुपने श्रमदान करून, स्वत: छप्पर घातले. अजूनही मदत देण्याचे काम सुरू आहे. ४५० घरांना मदत देण्याचा मानस या ग्रुपचा असून, त्यांच्या या सामाजिक जाणिवेचे कौतुक होत आहे.
गोरेगावातील तरुणांमुळे ३५ गावांतील ३४० कुटुंबांना मिळाले छप्पर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 12:37 AM