मधुकर ठाकूर
उरण : येथील वीर वाजे कर महाविद्यालयात नव मतदार नोंदणी व मतदान जागृती उपक्रम डॉ. उद्धव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.
महाविद्यालयाच्या निवडणूक साक्षरता मंडळ कमिटीच्यावतीने प्रथम वर्षातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी व मतदान जागृतीचा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता. नायब तहसीलदार श्रीमती माधुरी म्हात्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी. जी. पवार तसेच महसूल अधिकारी शेख आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते .
या कार्यक्रमाप्रसंगी उरण तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी युवकांसाठी मतदार नोंदणी लोकशाही सुदृढ व बळकट करण्यासाठी किती आवश्यक आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. युवकांमध्ये देशाचा विकास करण्याची ताकद आहे. प्रत्येक मत मोलाचे आहे. लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी मतदान होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदानाविषयी लोकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे असे मत तहसीलदार डॉ.कदम यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी ऑनलाइन मतदार नोंदणी कशी करावी, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत या संदर्भात त्यांनी नवमतदारांना मार्गदर्शन केले.
नायब तहसीलदार श्रीमती माधुरी म्हात्रे यांनी मतदानाची टक्केवारी अधिक वाढण्यासाठी युवकांबरोबरच महिलांनी सुद्धा मतदान करणे आवश्यक आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच लोकशाही प्रगल्भ होण्यासाठी जबाबदारीने मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया आपल्या घरी व गावामध्ये सुद्धा पोहोचवावी असे सांगून यासाठी शतप्रतिशत मतदान नोंदणीचा कालबद्ध कार्यक्रम राबविला जाईल असे आश्वासन म्हात्रे यांनी दिले.
शतप्रतिशत मतदानातून सुदृढ व बळकट लोकशाही निर्माण करण्यासाठी युवकांनी मतदार नोंदणी व मतदानाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी जी. पवार यांनी केले. या ऑनलाइन मतदार नोंदणीच्या प्रक्रियेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.
कार्यक्रमाप्रसंगी निवडणूक साक्षरता मंडळ कमिटीचे समन्वयक डॉ. संदीप घोडके, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. राम गोसावी, डॉ. सुजाता पाटील, महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास महाले, निवडणूक साक्षरता मंडळ कमिटीचे सदस्य डॉ. आर. एस. जावळे , प्रा. आर. डी. कांबळे व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी प्रथम वर्षाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.