कर्जत : खालापूर तालुक्यातील खोपोली येथील झेनिथ कंपनीच्या वसाहतीतील वीजपुरवठा गेल्या ४२ दिवसांपासून बंद आहे, तो त्वरित सुरू करावा, अशी मागणी वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. झेनिथ बिर्ला इंडिया हा कारखाना १२ डिसेंबर २०१३ पासून मालकांनी बेकायदा बंद केला आहे. कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये एकूण ७२ कामगार कु टुंबांसह राहत आहेत. बंदच्या काळात कंपनीने वीजबिल न भरल्यामुळे चार ते पाच वेळा वसाहतींमध्ये राहणाºया कामगारांना अंधारात राहण्याची वेळ आली होती. ७ जानेवारी २०२० पासून कंपनीच्या व्यवस्थापनाने वीजबिल न भरल्यामुळे वसाहतीच्या इमारतींमधील कामगारांवर काळोखात राहण्याची वेळ आली आहे. याबाबत कर्मचाºयांनी संबंधित सर्वांशी पत्रव्यवहार करूनही आमची कोणीही दखल घेत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
१३ फेब्रुवारी २०२० रोजी कामगार ठाणे येथील न्यायालयात गेले असता व्यवस्थापनाच्या अधिकाºयांनी न्यायालयात हमीपत्र दिले आहे. यामध्ये आम्हाला थोडा वेळ द्या, आम्ही टप्प्याटप्प्याने रक्कम भरू. त्याप्रमाणे व्यवस्थापनाने १ लाख १९ हजार ही रक्कम १४ फेब्रुवारीला भरली आहे. न्यायालयात सादर केलेले हमीपत्र व काही रक्कम भरल्याची पावती वीज वितरण कंपनीचे पेण येथील अभियंता दीपक पाटील यांना दिली आहे, तरीसुद्धा वीजपुरवठा चालू करत नसल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. जोपर्यंत कामगारांचा निर्णय लागत नाही तोपर्यंत वीज व पाणीपुरवठा नियमित ठेवावा, असे आदेश न्यायालयाने कंपनीच्या व्यवस्थापनाला दिले आहेत. तरीही कामगारांना अंधारात राहावे लागत आहे.परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांची अडचणकंपनीच्या वसाहतीमध्ये वृद्ध, अपंग, नवजात बालक राहात आहेत. तसेच सध्या बारावीची परीक्षा सुरूआहे, पुढच्या महिन्यात दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. याच कालावधीमध्ये वसाहतीमधील वीजपुरवठा खंडित केल्याने विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. याबाबत अभियंता पाटील यांची भेट घेऊन वीजपुरवठा सुरू करावा, अशी विनंती केली असता सर्व वीजबिल भरा तरच तुमची लाईट चालू केली जाईल, असे सांगितले. शेवटची रक्कम ३१ मार्च रोजी भरू तोपर्यंत आम्हाला अंधारातच ठेवणार आहेत का, असे कामगारांचे म्हणणे आहे.