अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसने उमेदवार न दिल्याने महाविकास आघाडीचा धर्म पाळण्यात आल्याचे दिसून येते. शेकापच्या योगिता पारधी यांची अध्यक्षपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे भाजपचे तीन सदस्य हे गैरहजर राहिले, तर शिवसेनाचा एक सदस्य उपस्थित राहिला नाही.रायगड जिल्हा परिषदेवर शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची आघाडी आहे. याआधी अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले होते, तर उपाध्यक्ष पद हे शेकापकडे होते. अनुक्रमे आदिती तटकेर आणि आस्वाद पाटील यांनी गेली अडीच वर्षे जिल्हा परिषदेचा कारभार चालवला होता. त्यांनतर अध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आले. त्यामुळे घराणेशाहीला आपोआपच लगाम लागल्याने प्रस्थापितांचे स्वप्न भंगले होते. राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीमध्ये शेकापही आहे. शेकापने अध्यक्षपदासाठी पनवेल तालुक्यातील योगिता पारधी यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, तर राष्ट्रवादीने कर्जत तालुक्यातील सुधाकर घारे यांचा अर्ज दाखल केला. मात्र, काँग्रेससह शिवसेनेने आपल्या उमेदवारांचा अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे निवडणूक बिनविरोध पार पडली. राज्यातील महाविकास आघाडीचा धर्म पाळल्याचे त्यावरून दिसून येते.सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली. त्यानंतर दुपारी २ वाजता अर्जाची छाननी करण्यात आली. अन्य कोणीच उमेदवारी अर्ज दाखल केला नसल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानुसार पीठासीन अधिकाऱ्यांनी अध्यक्षपदी शेकापच्या योगिता पारधी, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. याआधीच्या निवडणुका काँग्रेस, शेकाप, शिवसेना यांनी एकमेकांच्या विरोधात लढल्या होत्या. कट्टर विरोधक असल्याने एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंतही राजकारण तापत होते. आजच्या निवडणुकीत शिवसेनेने उमेदवार दिला नाही, त्यामुळे भाजपलाही गप्प बसावे लागले आहे.भाजपचे तीन सदस्य गैरहजरजिल्हा परिषदेमध्ये शेकापचे २१, शिवसेनेचे १८, राष्ट्रवादी काँग्रेसचे १२, काँग्रेसचे पाच आणि भाजपचे तीन असे एकूण ५९ सदस्य आहेत. आजच्या निवडणुकी वेळी भाजपचे तीन आणि शिवसेनेचा एक सदस्य गैरहजर होता. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शेकाप विरोधात शिवसेना अशी कडवी टक्कर अनुभवाला मिळाली होती. मात्र, आजच्या निवडणुकीत त्यांनी आपला उमेदवार दिला नाही. त्यांना आज विरोधी लढलेल्या पक्षाला समर्थन द्यावे लागले आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, शेकाप यांच्या नव्या समीकरणामुळे आगामी निवडणुका या एकत्रित लढल्या जातील की वेगवेगळ्या, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.दिवसभर रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीवर मोठ्या संख्येने सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. निवडणूक बिनविरोधात पार पडणार हे जवळ जवळ स्पष्ट झाले होते. त्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये धाकधूक दिसून आली नाही.आरक्षणामुळे फिरले चक्र : अध्यक्षपद हे पनवेल तालुक्याकडे गेल्याने आता अलिबागमधील शेकापचे वर्चस्व कमी होणार असल्याचे बोलले जाते. आरक्षण अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव झाल्याने अध्यक्षपदाच्या खुर्चीकडे डोळे लावून बसलेल्यांचे मनसुबे मात्र धुळीला मिळाले. पेण तालुक्याला अध्यक्षपद देण्यात येणार होते. मात्र, आरक्षणामुळे सर्वच चक्र फिरली.
जिल्हा परिषदेची निवडणूक: महाविकास आघाडीचा धर्म पाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:37 AM