जिल्हा परिषद आरक्षणाची आज सोडत; उत्सुकता शिगेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:03 PM2019-11-18T23:03:20+5:302019-11-18T23:03:30+5:30

नीलिमा पाटील, महादेव दिवेकर, दिलीप भोईर यांच्या नावाची चर्चा

Zilla Parishad releasing reservation today | जिल्हा परिषद आरक्षणाची आज सोडत; उत्सुकता शिगेला

जिल्हा परिषद आरक्षणाची आज सोडत; उत्सुकता शिगेला

Next

अलिबाग : जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवार, १९ नोव्हेबर रोजी मंत्रालयात पार पडणार आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण पडणार याबाबत कमालीची उत्सुकता आहे. या वेळेला अध्यक्षपदी पेण तालुक्यातील सदस्याला संधी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. आरक्षण खुला प्रवर्ग अथवा ओबीसी पडल्यास नीलिमा पाटील, तर एसटी प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यास शेकापचे महादेव दिवेकर आणि दिलीप भोईर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.

जिल्हा परिषदेमध्ये शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची आघाडी आहे. शिवसेना आणि भाजप हे विरोधी बाकावर बसले आहेत. जिल्हा परिषदेमधील पक्षीय बलाबल शेकाप २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी १२, काँग्रेस आणि भाजप प्रत्येकी तीन असे एकूण ५९ सदस्य आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे फक्त १२ सदस्य निवडून आले असताना त्यांना थेट अध्यक्षपद देण्यात आले होते. खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या अध्यक्षपदी विराजमान होत्या. त्या श्रीवर्धनमधून विधानसभेवर निवडून गेल्याने तसेच त्यांचा अडीच वर्षांचा कालावधी संपत आल्याने त्यांनी काहीच दिवसांपूर्वी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. सध्या शेकापचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील हे हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. शिक्षण व आरोग्य आणि महिला बालकल्याण या विभागाचे सभापतीपद शेकापने राष्ट्रवादी कँग्रेसला दिले आहे. शेकापकडे उपाध्यक्ष, अर्थ व बांधकाम, समाजकल्याण आणि कृषी विभागाचे सभापती पद आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. अलिखित नियमानुसार आता अध्यक्षपद हे शेकापकडे जाणार आहे.

या वेळी पेण विभागाला नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी शेकापच्या सदस्या नीलिमा पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आहे. ओबीसी महिला अथवा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्यास पाटील त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे बोलले जाते. एसटी प्रवर्गाचे आरक्षण पडल्यास पेणमधून शेकापचे महादेव दिवेकर आणि अलिबागमधील दिलीप भोईर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, राज्यात सत्तेत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीने रायगड जिल्हा परिषदेतील सत्तांतर होईल की तेच राहील हे आरक्षण सोडतीनंतरच समोर येणार आहे.

सध्या शेकापचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील हंगामी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. शिक्षण व आरोग्य आणि महिला बालकल्याण या विभागाचे सभापतीपद शेकापने राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे.

Web Title: Zilla Parishad releasing reservation today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.