जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींंची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 10:47 PM2019-07-09T22:47:42+5:302019-07-09T22:47:49+5:30

छताला लागली गळती : नेरळमधील कोतवालवाडी, ऐनाचीवाडीतील विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे? शिक्षक विवंचनेत

Zilla Parishad School Buildings in worst condition | जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींंची दुर्दशा

जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींंची दुर्दशा

Next

- कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : कर्जत तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतीमधील कोतवालवाडी आणि नांदगाव ग्रामपंचायतीमधील ऐनाचीवाडीतील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारतींत गळती लागली आहे. आदिवासीवाडीत शाळा भरविण्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांनी बसायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


ओलमण ग्रामपंचायतीमधील कोतवालवाडीमध्ये रायगड जिल्हा परिषदेची इयत्ता चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. त्या शाळेत २० विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना शिकविण्यासाठी दोन शिक्षकांची नियुक्ती कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केली आहे. त्या ठिकाणी असलेल्या इमारतीमधील दोन्ही वर्गखोल्यांचे बांधकाम निकृष्ट करण्यात आल्याने पावसाच्या पाण्याची गळती वर्गखोल्यात सुरू झाली आहे. हे प्रमाण भरपूर असल्याने वर्गात पाणीच पाणी साचून राहिले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना बसायला जागा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना बसवायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


तर नांदगाव ग्रामपंचायतीमधील ऐनाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीतही गळती लागली आहे. त्यामुळे त्या शाळेत इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या २६ विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही, त्यामुळे तेथे असलेले दोन्ही शिक्षक हैराण झाले आहेत. तर विद्यार्थ्यांना बसवून त्यांच्याकडून कसा अभ्यास करून घ्यायचा, या विवंचनेत शिक्षक आहेत.


त्यात ऐनाचीवाडीमधील शिक्षकांनी आपल्या शाळेच्या इमारतीला प्लॅस्टिक कापड लावून पावसाळ्यातील पाण्याची गळती रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही पाणी आत येऊन दोन्ही वर्गखोल्यांमध्ये पसरले आहे. त्यात ऐनाचीवाडी आणि कोतवालवाडीमध्ये शाळा भरविण्याएवढी जागा उपलब्ध नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठे बसवून शाळा सुरू ठेवावी असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. तर एका ठिकाणी असलेले समाजमंदिर हे ग्रामस्थांनी सार्वजनिक भांडी भरून ठेवल्याने तेथे जागा निर्माण करण्याचा प्रयत्नही संपला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी जागा नसल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे.

 

या दोन्ही शाळांना भेटी देत असताना शाळेच्या सर्व वर्गखोल्यांत पाणी साचले असल्याचे दिसून आले. यापूर्वी शिक्षकांनी शिक्षण विभागाला पावसाचे पाणी आतमध्ये येऊन विद्यार्थ्यांना बसायला अडचण निर्माण होईल याची माहिती दिली होती, तरीही दुरुस्ती करण्याचा विषय पुढे सरकला नसल्याने आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी कुठे बसायचे?असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- जयवंती हिंदोळा, सदस्या,
कर्जत पंचायत समिती


ऐनाचीवाडी आणि कोतवालवाडी या दोन्ही ठिकाणी शाळेच्या इमारतींची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी सूचना दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांकडून आली होती. त्याबाबत आम्ही बांधकाम विभागाला कळविले होते.
- जी. बी. हिवरे,
प्रभारी गटशिक्षणाधिकारी, कर्जत

Web Title: Zilla Parishad School Buildings in worst condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.