खासगी शाळांपेक्षा जिल्हा परिषदेच्या शाळांना पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2019 11:11 PM2019-06-01T23:11:57+5:302019-06-01T23:12:46+5:30
यंदा ४,४५१ विद्यार्थ्यांचा प्रवेश : खासगी शाळांमध्ये १,३६० मुलांचा प्रवेश
जयंत धुळप
अलिबाग : जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सरकारी शाळामध्ये चांगले शिक्षण मिळत नाही, असा एक समज पालकांमध्ये दिसून येतो; परंतु गेल्या काही वर्षांत जिल्हा परिषद शाळांचे डिजिटलायझेशन झाले आहे. शाळांच्या चेहरामोहोऱ्यासह शैक्षणिक दर्जाही बदला आहे. याचाच परिणाम म्हणून ग्रामीण भागात पालकांमध्ये जि.प. शाळांच्या बाबतीत सकारात्मकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यात इयत्ता पहिलीमध्ये दाखल पात्र एकूण ३० हजार ७०५ विद्यार्थी आहेत. यात १५ हजार ८४५ मुले, तर १४ हजार ८६० मुलींचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश पात्र एकूण मुलांची संख्या सहा हजार २०९ आहे. त्यापैकी सर्वाधिक ७१.६८ टक्के म्हणजे चार हजार ४५१ मुलांच्या पालकांनी पाल्याचा प्रवेश रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घेतला, तर जिल्ह्यातील नगरपालिकांच्या शाळांमध्ये ३९८ मुलांनी प्रवेश घेतला आहे. खासगी शाळांमध्ये एक हजार ३६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील दुर्गम भागातील काही शाळांमधील पटसंख्या कमी होण्याची समस्या जिल्ह्यात होती. अशा ५७३ शाळांपैकी २४६ शाळांचे जवळच्या जिल्हा परिषद शाळेत समायोजन करून ही समस्या सोडवण्यात आली. रायगड जि.प. अध्यक्षा अदिती तटकरे, उपाध्यक्ष अॅड. आस्वाद पाटील आणि जि.प. सदस्य यांच्या सहयोगातून गतवर्षभरात रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आले. त्यांच्या माध्यमातून शाळा व स्थानिक ग्रामस्थांमध्ये आपुलकीचे नाते वृद्धिंगत झाले, त्यांतून जि.प. शाळांच्या विकासाकरिता आवश्यक साहाय्य व उपक्रम स्थानिक पातळीवरच सुरू झाले. जि.प. शाळांतील मुलांकरिता उन्हाळी आणि हिवाळी सुट्टीच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या व्यक्तिमत्त्व विकास शिबिरांमुळे मुलांची या शाळांना पसंती मिळू लागली. तालुकास्तरावर शिक्षकांचे मेळावे घेऊन विद्यार्थी गुणवत्तावाढीकरिता शाळांमध्ये करण्यात आलेल्या विविध उपक्रमांचे सकारात्मक परिणाम साध्य झाले आणि त्यातून पालकांचा जिल्हा परिषदेच्या शाळांबाबतचा दृष्टिकोन बदलू लागला.
जिल्ह्यातील पालकांनी जिल्हा परिषदांच्या शाळांवर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी आता जिल्हा परिषदेची आहे. ही जबाबदारी यशस्वी करण्याकरिता शिक्षण विभागाच्या माध्यमातून विशेष नियोजनदेखील करण्यात आल्याचे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी सांगितले. १५ ते ३० जून या काळात विद्यार्थ्यांकरिता उजळणीवर्ग होतील. जुलै ते सप्टेंबर या या तीन महिन्यांच्या कालावधीत लेखन व वाचन उपक्र मांचे आयोजन करण्यात येणार आहे. अशाच प्रकारे मार्च अखेरपर्यंत शैक्षणिक गुणवत्तावाढीच्या दृष्टीने विविध पूरक प्रयत्न राहतील, असे नियोजन त्यांनी सांगितले.
माझे प्राथमिक शिक्षण नाशिक जिल्हा परिषदेच्या देवळा येथील जीवन शिक्षण विद्यामंदिर या शाळेत झाले, याचा सार्थ अभिमान मला आहे. या शाळेतच खऱ्या अर्थाने शैक्षणिक विकासाचा प्रवास सुरू झाला. आजही प्रयत्न केले तर जि.प. शाळेच्या माध्यममातून चांगले आयएएस अधिकारी घडू शकतात, असा माझा विश्वास आहे. - डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हाधिकारी, रायगड
मुंबईतील माझगाव येथील मुंबई महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झाले. याच शाळेने वैचारिक विकासाची प्रक्रिया सुरू केली आणि शैक्षणिक गोडी निर्माण झाली. हाच प्रयत्न रायगड जि.प.च्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. - दिलीप हळदे, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड
अकोला जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतला आणि शालेय जीवन सुरू झाले. ज्या शाळेने घडवले, त्या शाळेला विसरू शकत नाही. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आजही प्रयत्नपूर्वक बदल केले, तर गुणवंत विद्यार्थी घडवू शकतात. - अनिल पारसकर, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक