जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 11:33 PM2020-01-15T23:33:54+5:302020-01-15T23:34:49+5:30
समाज कल्याण दिलीप भोईर, महिला बाल कल्याण गीता जाधव यांच्याकडे
अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या चार विषय समिती सभापतिपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी दोन सभापतिपदे मिळाली. शेकापचे दिलीप भोईर यांची समाजकल्याण तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता जाधव यांची महिला बालकल्याण सभापतिपदी तर अन्य दोन विषय समिती सभापतिपदी अनुक्रमे शेकापच्या अॅड. नीलिमा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बबन मनवे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शारदा पोवार यांनी जाहीर केले. नीलिमा पाटील आणि बबन मनवे यांना कोणत्या विषय समितीचा कारभार पाहवा लागणार याबाबत अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.
जिल्हा परिषदेच्या प्रभाकर पाटील सभागृहात विषय समितीच्या सभापतिपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. या प्रसंगी शिवसेना आणि भाजपचे सदस्य गैरहजर असल्याचे दिसून आले. शेकापकडून दिलीप भोईर यांनी समाजकल्याण सभापतिपदासाठी तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गीता जाधव यांनी महिला व बालकल्याण सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज दाखल न केल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाली. अन्य दोन विषय समितिपदासाठी शेकापच्या अॅड. नीलिमा पाटील, राष्ट्रवादीचे बबन मनवे यांचीही बिनविरोध निवड झाली.
विषय समिती सभापतिपदाच्या आजच्या निवडीकडे शिवसेनेसह भाजपच्या सदस्यांनी पाठ फिरवल्याने चारही सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अर्थ आणि बांधकाम सभापतिपदासाठी शेकापच्या अॅड. नीलिमा पाटील या इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांचीच वर्णी लागणार असल्याचे बोलले जाते.
समाज कल्याण, महिला व बालकल्याण सभापतिपद अनुक्रमे शेकाप, राष्ट्रवादीकडे गेले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे हे कोणत्याही एका विषय समितीचे सभापती असतात. अद्याप शिक्षण व आरोग्य, कृषी व पशू संवर्धन आणि अर्थ व बांधकाम या तीन विषय समित्यांवर सभापती विराजमान झालेले नाहीत.