जि.प. शाळा बंद पडण्याच्या मार्गावर
By admin | Published: September 7, 2016 03:04 AM2016-09-07T03:04:47+5:302016-09-07T03:04:47+5:30
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भारताचे माजी अर्थमंत्री तथा जागतिक कीर्तीचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. सी. डी. देशमुख यांनी १९०४ मध्ये श्रीगणेशाचे धडे गिरवले
पुरुषोत्तम मुळे, तळा
रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत भारताचे माजी अर्थमंत्री तथा जागतिक कीर्तीचे थोर अर्थशास्त्रज्ञ डॉ. सी. डी. देशमुख यांनी १९०४ मध्ये श्रीगणेशाचे धडे गिरवले ती प्राथमिक शाळा विद्यार्थी संख्येच्या अभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे.
१८६१ मध्ये स्थापना झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला जवळपास १५० वर्षे होऊन गेले. तरीही या शाळेचे दगडी बांधकाम अजूनही मजबूत आहे. या शाळेत शिक्षणाचे धडे गिरविणारे अनेक विद्यार्थी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, यशस्वी उद्योजक, उच्च पदस्थ अधिकारी झाले. माजी अर्थमंत्री डॉ. चिंतामणराव देशमुख यांच्यासारखे थोर व्यक्ती शिक्षण घेऊन येथून बाहेर पडले. आम्ही तळेकर नागरिक अभिमानाने सांगतो की, या दगडी शाळेत डॉ. सी. डी. देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. अशीही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आज बंद होण्याच्या मार्गावर आहे.
इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा आणि मुलांचा ओढा वाढत चालला आहे. आपल्या प्राथमिक शाळेत सर्व सुविधा आहेत, मोफत शिक्षण आहे, इंग्रजी शिकविणारे शिक्षक उत्तम आहेत. आज अनेक प्राथमिक शाळा डिजिटल झाल्या आहेत. जिल्ह्यातून राज्यातून तळा तालुक्यातील प्राथमिक डिजिटल शाळा पाहण्यासाठी जवळपास २५० ते ३०० प्राथमिक शिक्षक येऊन गेले. तालुक्यातील या शाळेतील गुणवत्ता तसेच इंग्रजीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेले ज्ञान, गणित पद्धती यावर खूश होवून शाळांचे कौतुक केले. परंतु हल्ली पालकवर्गाचीच मानसिकता बदलत आहे. त्यांना वाटते माझ्या मुलाला इंग्रजी शाळेत टाकले म्हणजे त्याला जास्त इंग्रजी येईल. यापुढे आम्ही शिक्षक काय करणार? अनेक वेळा आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने पालकांना समजावून त्यांची मने वळवण्याचा प्रयत्न करतो पण ते काही शक्य होत नाही, असे मुख्याध्यापक सुनील कवळे यांनी सांगितले.
जोपर्यंत पालकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत प्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्येमध्ये वाढ होणार नाही, अशी चिन्हे या परिस्थितीवरून दिसत आहेत. शिक्षक प्रयत्न करीत असतात. मात्र पालकांना कळले पाहिजे की प्राथमिक शाळेत देखील नर्सरीसारखे वर्ग सुरू करून या खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना शह दिला तरच पुन्हा पूर्वीप्रमाणेच प्राथमिक शाळेतील विद्यार्थीसंख्या वाढेल, अन्यथा येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जावे लागेल आणि एक दिवस प्राथमिक शिक्षकांची परिस्थिती भयानक होईल असे कवळे म्हणाले.