रोहा यात्रेत जत्तर काठ्यांचे आकर्षण
By admin | Published: April 16, 2016 01:13 AM2016-04-16T01:13:26+5:302016-04-16T01:13:26+5:30
तालुक्यातील तळाघर येथील प्रसिध्द स्वयंभू महादेवाच्या यात्रेला शुक्र वारी प्रारंभ झाला. सलग दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत महादेवाचे लग्न, त्यानंतर छबिना पाहण्यासाठी तळा, मुरूड, रोहा, श्रीवर्धन
रोहा : तालुक्यातील तळाघर येथील प्रसिध्द स्वयंभू महादेवाच्या यात्रेला शुक्र वारी प्रारंभ झाला. सलग दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत महादेवाचे लग्न, त्यानंतर छबिना पाहण्यासाठी तळा, मुरूड, रोहा, श्रीवर्धन, म्हसळा व इतरत्र ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने येतात. या यात्रेत महादेवाच्या विवाहाचे सर्व विधी, मानपान बहुजन समाज करीत आला आहे. अनेक श्रध्दाळू प्रथा आजही जपल्या जातात. जत्तरच्या काठ्या हे प्रमुख आकर्षण असते, तर खाऱ्या चिंबोरीचे कालवण प्रसाद म्हणून प्रथा पाळणारी ही एकमेव यात्रा आहे.
कोळी बांधव महादेववाडीच्या सुतारांची गळाभेट घेण्यासाठी पायी येतात. लग्न विधी करण्यासाठी सात गावचे जंगम येतात. रात्री बारा वाजता लग्न मुहूर्त असतो. विधीसाठी लागणारी मातीची भांडी दमखाडीचे कुंभार देतात, तळाघरचे मोरे दीपमाळ लावतो, खारगांव येथून पालखी येते. बामुगडे घराणे मानाची निमंत्रणे द्यावयास जातो. सोनगावचे ग्रामस्थ तेलवण, वरातीचे आमंत्रण देतात. धाटावहून काठी तेलवणाच्या दिवशी येते. पालखीला तारेगावचे भोई असतात. मग शिवपार्वतीची जत्तर काठीवर प्रतिष्ठापना होते. वारळची काठी मंदिरासमोर उखळात उभी करतात.
सुतार भगत महादेवाची मूर्ती मांडीवर घेवून विवाहास बसतात. शेजारी धाटावचे रटाटे असतात. किल्ल्याची करवली, तळाघरचा करवला उभा असतो. स्थानिक पोलीस पाटील यांस विशेष मान असतो. मंगलाष्टक धाटाव, लांढर, भुवेनश्वर, देवकान्हेचे जंगम म्हणतात. असा हा सोहळा दोन दिवस रंगत असतो. यात्रेत तीर्थासाठी झुंबड उडते. ही श्रध्दा अनेक दशके पाळली जात आहे. महादेवाच्या यात्रेला ऐतिहासिक वारसा असल्याचे पुरावे आहेत. जंजिरा संस्थानच्या सिद्दीची आईही महादेवाची भक्त होती असा उल्लेखही आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ग्रुप अध्यक्ष सुरेश मगर, सर्व कार्यकारिणी, सरपंच, सदस्य, तळाघर, महादेववाडी, वाशी ग्रामस्थ, यात्रा समिती विशेष परिश्रम घेत आहे.