जयपूर : राजस्थानमध्ये पहिल्यांदाच मान्सूनपूर्वीच पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळ बिपाेरजॉयने चार दिवसांत राज्याच्या अनेक भागांत एवढा पाऊस पाडला की, मान्सूनचा कोटा पूर्ण झाला. बाडमेर, पाली, राजसमंद, भिलवाडा, अजमेरच्या अनेक भागात पूर आला आहे. अजमेरमध्ये पावसाने १०५ वर्षांचा विक्रम मोडला.
गेल्या २४ तासांत पाली येथील मुठाणा येथे तब्बल ५३० मि.मी. म्हणजेच २१.३ इंच एवढा पाऊस झाला. बुंदी, अजमेर, भिलवाडा येथील शेकडो गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. राज्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा, बारां-सवाई माधेपूर येथे हवामान खात्याने मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी जयपूरमध्ये मंगळवारी दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.
मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणीबिपाेरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंगळवारी चौहटन आणि सांचौर येथे भेट दिली.
२४ तासांत १३१.८ मि. मी. पाऊस अजमेरमधील पावसाचा १०५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. येथे १७ जून १९१७ रोजी एकाच दिवसात ११९.४ मि.मी. पाऊस पडला होता. तो आतापर्यंतचा सर्वाधिक पावसाचा विक्रम होता. तो १९ जून रोजी मोडला. १८ जून रोजी सकाळी ८:३० ते १९ जून रोजी सकाळी ८:३० या २४ तासांत अजमेरमध्ये १३१.८ मि.मी. पाऊस झाला. अजमेरमधील पाऊस इथेच थांबला नाही. १९ जून रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली होती.