एकमेकांना रनआऊट करण्यात गेली ५ वर्षे; मोदींची कॉंग्रेसवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:03 AM2023-11-20T08:03:28+5:302023-11-20T08:04:28+5:30
पंतप्रधान मोदींची कॉंग्रेसवर उपरोधिक टीका
लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : देशात विश्वचषकाचा ज्वर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी तोच धागा पकडून काँग्रेसवर जाेरदार हल्लाबोल केला.
‘राजस्थान काँग्रेस पक्ष एखाद्या क्रिकेट संघासारखा आहे, ज्यांच्या फलंदाजांनी एकमेकांना धावबाद करण्यात पाच वर्षे घालवली,’ अशी उपरोधिक टीका त्यांनी केली.
तारानगर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राजेंद्र राठोड यांच्या समर्थनार्थ चुरू जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित करताना, मोदींनी राज्याचा जलद विकास सुनिश्चित करण्यासाठी आगामी राजस्थान निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले.
क्रिकेटमध्ये एक फलंदाज येतो आणि त्याच्या संघासाठी धावा काढतो; पण काँग्रेसमध्ये एवढी भांडणे आहेत की, धावा करण्याऐवजी त्यांच्या नेत्यांनी एकमेकांना धावबाद करण्यातच पाच वर्षे घालवली आणि राजस्थानचा विकास खोळंबला. आम्ही राजस्थानला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेऊ, असे ते म्हणाले.
राज्याचा वेगवान विकास करणार...
काँग्रेस आणि विकास हे एकमेकांचे शत्रू आहेत आणि शत्रूच राहतील. चांगला हेतू आणि काँग्रेस यांच्यातील संबंध प्रकाश आणि अंधार यांच्यासारखाच आहे.
राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास सर्व भ्रष्ट लोकांना बाहेर घालवणार आणि राज्याचा वेगवान विकास करणार, असे आश्वासनही त्यांनी दिले.
भारत प्रत्येक क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे आणि नवीन पराक्रम गाजवत आहे. कोणतेही क्षेत्र घ्या, भारत आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. सर्वत्र उत्साह आहे आणि २०४७ पर्यंत आपण भारताला विकसित देश बनवू, असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.