जयपूर : झुंझुनू येथील पंतप्रधानांच्या सभेसाठी जात असलेल्या पोलिसांची कार ट्रकवर धडकली. चुरू जिल्ह्यात रविवारी पहाटे झालेल्या या अपघातात ६ पोलिसांचा मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल केले. झुंझुनू येथील पंतप्रधानांच्या निवडणूक प्रचार सभेच्या बंदोबस्तासाठी नागौरच्या खिंवसर पोलिस ठाण्यातील सहा व महिला पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. हे पोलिस कारने झुंझुनूला जात असताना राष्ट्रीय महामार्ग ५८ वर सुजानगढ सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्यांची कार ट्रकवर आदळली. पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला. यात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. खिंवसर पोलिस स्टेशनचे सहायक फौजदार रामचंद्र, शिपाई कुंभाराम, सुरेश मीना, थानाराम व महिला पोलिस स्टेशनचे शिपाई महेंद्र अशी या अपघातात ठार झालेल्या पोलिसांची नावे आहेत. या अपघातात खिंवसर पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल सुखाराम आणि कॉन्स्टेबल सुखाराम हे जखमी झाले. त्यांना जोधपूरला हलविण्यात आले. तथापि, वाटेत कॉन्स्टेबल सुखाराम यांचाही मृत्यू झाला. (वृत्तसंस्था)