धौलपूर - राजस्थानच्या धौलपूर इथं ८ वीच्या वर्गात शिकणाऱ्या १४ वर्षीय मुलाला वडिलांनी ओरडलं म्हणून तो घरातून पळून गेला. काही वेळानंतर मुलगा घरात दिसला नाही म्हणून बापाचा जीव कासावीस झाला. त्यांनी पोटच्या मुलाला सगळीकडे शोधले. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. परंतु बेपत्ता मुलाचा कुठेही शोध लागला नाही.
अनेक वर्ष सरली आणि वडिलांनी मुलगा परत सापडण्याची आशा सोडली. मात्र अचानक २४ वर्षांनी पोलीस बेपत्ता युवकाचे मामा रमाशंकर यांच्या घरी पोहचली. तिथे तुमचा भाचा नित्यकिशोर अवैध दारूच्या प्रकरणी जेलमध्ये बंद असल्याचे सांगितले. पोलिसांनी युवकाचा फोटो दाखवला. त्यानंतर रमाशंकर यांनी ही माहिती मुलाचे वडील किर्तीराम यांना दिली. ही बातमी ऐकून सगळेच गोंधळात पडले. मुलगा जिवंत आहे आणि तो पुन्हा येणार या आनंदाने कुटुंब सुखावले. परंतु मुलगा जेलमध्ये बंद असल्याचेही दु;ख त्यांच्या चेहऱ्यावर होते.
२४ वर्षांनी मुलगा घरी परतला...त्यानंतर किर्तीकुमार यांनी रमाशंकर यांच्यासोबत जात नित्यकिशोरला जामीन मिळवून देत घरी आणले. २४ वर्षांनी मुलगा घरी परतल्याने आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू आले. नित्यकिशोरने सांगितले की, घरातून पळून गेल्यानंतर पोट भरण्यासाठी मी लोकांची भांडी घासली. त्यावेळी माझी मानसिक अवस्था बिघडली. मी घरचा रस्ता विसरून गेलो. कुटुंबाची खूप आठवण येत होती. नातेवाईकांची आठवण यायची पण काहीच करू शकत नव्हतो. किर्तीकुमार बघेल यांनी मुलगा ८ वी असताना कमी मार्क मिळाल्याने त्याला ओरडा दिला होता. त्यामुळे नाराज नित्यकिशोरने घर सोडले होते. नित्यकिशोर ज्याठिकाणी काम करायचा तेथील मालकाला वाचवण्यासाठी त्याने अवैध दारूचे आरोप स्वत:वर घेतले. त्यानंतर पोलिसांनी नित्यकिशोरला अटक करून जेलमध्ये पाठवले. पोलिसांनी तपास सुरू केला तर तो धौलपूर इथं राहत असल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी या युवकाच्या घरचा शोध घेत त्यांच्या घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर घरच्यांनी नित्यकिशोरला सोडवले आणि घरी आणले.
२५ नोव्हेंबर १९९९ मध्ये घर सोडलं होतं...वडील किर्तीकुमार बघेल यांनी सांगितले की, २५ नोव्हेंबर १९९९ ला मुलाला ओरडल्याने तो घरातून बाहेर निघून गेला. मी मुलाचा बऱ्याचठिकाणी शोध घेतला पण काही पत्ता लागला नाही. अनेक वर्ष मुलाच्या आठवणीत झुरून काढले. त्यानंतर मुलगा परत येईल ही आशा सोडली. २८ मे रोजी दौसा पोलीस लुहारी गावात पोहचली, मुलाच्या मामाकडे विचारणा केली तेव्हा मला फोटो आणि माहिती दिली. त्यानंतर आम्ही मुलाला जेलमधून सोडवले असं त्यांनी म्हटलं.