संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने निवडणूक घोषणा व टॅगलाईन तयार केली आहे. अब नही सहेगा राजस्थान - या घोषणेवर भाजप निवडणूक लढणार आहे.
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व राजस्थानचे प्रभारी अरुण सिंह यांनी सांगितले की, राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारच्या कारभाराविरुद्ध भाजपने ही घोषणा तयार केली आहे. त्याचबरोबर इतना भ्रष्टाचार अब नही सहेगा राजस्थान, इतनी गुंडागर्दी अब नही सहेगा राजस्थान, महिलाओंपर अत्याचार अब नही सहेगा राजस्थान यासारख्या घोषणाही दिल्या जाणार आहेत.
पुढील महिन्यात राजस्थानमध्ये भाजपकडून अशोक गेहलोत सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन छेडले जाणार आहे. यामध्ये संपूर्ण राजस्थानच्या रस्त्यावर राज्य सरकारच्या विरोधात लोकांचा आक्रोश दाखवला जाईल. भाजपचा आरोप आहे की, राजस्थानमध्ये कायदा-व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, सचिवालयातून सोने व कोट्यवधी रुपये काढले जात आहेत. महिलांमध्ये अत्याचार करण्यात राजस्थान अव्वल आहे. राजस्थानमध्ये भाजपने आतापर्यंत कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्याचा निर्णय घेतलेला नाही. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजमेर दौऱ्याच्या वेळी माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना देण्यात आलेल्या महत्त्वावर अरुण सिंह यांनी सांगितले की, त्या माजी मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे त्यांना सन्मान देणे गरजेचे आहे.
दर पाच वर्षांनी सरकारमध्ये बदल - अरुण सिंह
- हिमाचल प्रदेश व कर्नाटकच्या पराभवानंतर भाजप यावेळी आपल्या रणनीतीमध्ये बदल करणार आहे.
- अरुण सिंह म्हणाले की, दर पाच वर्षांनी राजस्थानमधील सरकार बदलत आले आहे. यावेळीही असेच होणार आहे. स्वत: अशोक गेहलोत यांनाच सरकारमधील मंत्री विरोध करीत आहेत.
- राजस्थानमध्ये भाजप घोषणापत्र एक महिना आधी जारी करणार आहे. अखेरच्या क्षणी घोषणापत्र जारी करण्याचा फायदा होत नाही.