अलवर: सीमा हैदरनंतर आता पाकिस्तानातील आणखी एक युवती आपल्या प्रेमाखातर सीमा ओलांडून भारतात आली आहे. तिचे नाव महवीश असून, ती राजस्थानातील चुरू जिल्ह्यामध्ये प्रियकराची भेट घेण्यासाठी आली. ही माहिती मिळताच भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या.
अलवर जिल्ह्यातील अंजू ही महिला आपल्या पाकिस्तानातील प्रियकराकडे गेली होती. तर सीमा हैदर प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तानातून १३ मे रोजी भारतात आली. आता महवीश ही आपला प्रियकर रहमान याला भेटण्यासाठी पीथिसर गावी पोहोचली आहे. रहमान सध्या कुवेतमध्ये काम करत असून, तो विवाहित आहे. त्याला दोन मुले आहेत. पीथिसरचे सरपंच जंग शेर खान महवीशला अटारी सीमेवरून घेऊन आपल्या गावात आले. पोलिस व गुप्तचर यंत्रणेला या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी तिची चौकशी सुरू केली आहे.
रहमानची पत्नी फरिदा हिला ही माहिती कळताच तिने पोलिसांकडे तिच्या विरोधात तक्रार दाखल केली. महवीश ही हेरदेखील असू शकते, असा आरोप फरिदाने केला आहे. तलाक झालेला नाही. त्यामुळे रहमानला दुसरे लग्न करण्याची परवानगी नाही, असेही फरिदा म्हणाली.
अंजू, सीमा हैदरनंतर आता महवीश चर्चेत
सीमा हैदर ही भारतातील सचिन या युवकाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. तिने अवैधरीत्या भारतात प्रवेश केला होता. ग्रेटर नॉयडा येथील रबुपुरा या भागामध्ये ती राहू लागली. ती पाकिस्तानी हेर असल्याचा आरोप होत आहे. तर अंजू पती व दोन मुलांना सोडून पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नसरुल्लाहकडे गेली. तिथे तिने त्याच्याशी विवाह केला. तिचे नाव फातिमा असे ठेवण्यात आले. पण काही महिन्यांनी अंजू पुन्हा भारतात परत आली.