नवी दिल्ली - मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात ३ डिसेंबरच्या निकालात भाजपाची सत्ता आली. त्यानंतर राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याचीच चर्चा सुरू झाली. छत्तीसगड आणि मध्य प्रदेश इथं भाजपा नेतृत्वानं दिग्गज नेत्यांना धक्के देत नवे नेतृत्व पुढे आणले. जी नावे चर्चेत होती त्यातील कुणालाही संधी न देता भाजपाने नवीन चेहऱ्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. भाजपा नेतृत्वाच्या या निर्णयानं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
छत्तीसगडमध्ये भाजपानं आदिवासी नेत्याला मुख्यमंत्री बनवले तर मध्य प्रदेशात तिसऱ्यांदा निवडून आलेल्या आमदाराच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातलीय. आता राजस्थानमध्ये भाजपा असाच काही निर्णय घेणार का हे पाहावे लागेल. विधिमंडळ भाजपा आमदारांची आज महत्त्वपूर्ण बैठक होईल यात मुख्यमंत्रिपदाची घोषणा होऊ शकते. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात भाजपानं आश्चर्यचकीत करणारी नावे आणली तसेच राजस्थानात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०१३-१८ या काळात भाजपा नेत्या वसुंधरा राजे या मुख्यमंत्रिपदाच्या चेहरा होत्या. त्यामुळे भाजपात त्यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु ज्यारितीने पक्षाने छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात बदल केले तसेच काही चित्र राजस्थानात दिसू शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ३ डिसेंबरला आलेल्या निकालात भाजपानं ११५ जागांवर विजय मिळवत राज्यात बहुमताचा आकडा गाठला तर काँग्रेसला केवळ ६९ जागांवर विजय मिळाल्याने त्यांच्या हातून राजस्थानची सत्ता गेली. भाजपाला बहुमत मिळाल्यानंतर ८ दिवस झाले तरी मुख्यमंत्रिपदावर निर्णय झाला नाही. आजच्या भाजपा विधिमंडळ बैठकीत यावर निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.
वसुंधरा राजेंचे CM पदासाठी लॉबिंगराजस्थानात निवडणूक निकाल लागल्यापासून वसुंधरा राजेंनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. अनेक आमदार वसुंधरा राजेंच्या भेटीला गेले. सोमवारीही काही आमदारांनी वसुंधरा राजेंची भेट घेतली. छत्तीसगडमध्ये आदिवासी, मध्य प्रदेशात ओबीसी आणि राजस्थानात सामान्य प्रवर्गातून मुख्यमंत्री बनवले जाईल असं बोलले जाते. तर रविवारी वसुंधरा राजेंनी भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. किमान १ वर्षासाठी मुख्यमंत्रिपद मिळावे अशी मागणी वसुंधरा राजेंनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर नड्डा यांनी वसुंधरा राजेंना आमदारांशी संवाद न साधण्याचा सल्ला दिला आहे. राजस्थानात वसुंधरा राजेंसोबतच बालकनाथ योगी, गजेंद्र सिंह शेखावत, दीया कुमारी, अश्विनी वैष्णव यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहेत.