राजस्थानात मुख्यमंत्रिपदासाठी अशोक गेहलोत पहिली पसंती; सर्व्हेक्षणात गेहलोत यांना सर्वाधिक कौल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 09:08 AM2023-10-11T09:08:27+5:302023-10-11T09:09:17+5:30
गहलोत यांना ३४ टक्के लोकांची पसंती असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांचे नाव आहे.
जयपूर : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना राजस्थानात काँग्रेस गड राखणार काय, असा सवाल उपस्थित होत आहे. एबीपी- सीवोटरने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, राजस्थानात काँग्रेस सरकारचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाच लोकांची सर्वाधिक पसंती दिसून येत आहे.
गहलोत यांना ३४ टक्के लोकांची पसंती असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपच्या नेत्या वसुंधरा राजे यांचे नाव आहे. त्यांना २२ टक्के लोकांची पसंती आहे. मात्र, या दोन नेत्यांच्या पसंतीतील टक्केवारीचे अंतर पाहता अशोक गेहलोत यांची लोकप्रियता राज्यात सर्वाधिक असल्याचे स्पष्ट होत आहे.
राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गत पाच वर्षांच्या काळात अनेक विकास योजना राबविल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना २५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार असो की, शेतकऱ्यांना मोफत वीज असो, या योजनांमुळे गेहलोत यांच्याबाबत लोकांमध्ये सकारात्मक मत आहे.
गेहलोत यांच्या स्पर्धेत ना स्वपक्षीय अथवा विरोधी पक्षांचे नेते नाहीत. काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांना १८ टक्के तर, भाजपचे गजेंद्र सिंह शेखावत यांना १० टक्के लोकांची पसंती आहे. त्यानंतर राज्यवर्धन राठोड यांना सात टक्के लोकांची पसंती आहे. तर, अन्य नेत्यांना नऊ टक्के पसंती आहे.
बहुतांश लोक कामकाजावर समाधानी
राजस्थानमधील ३९ टक्के लोक राज्य सरकारच्या कामकाजावर संतुष्ट असल्याचे या सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. तर, ३६ टक्के लोक कामकाजावर समाधानी आहेत. तथापि, २४ टक्के लोक असमाधानी असून एक टक्के लोकांनी काहीही मत नोंदविलेले नाही. ही आकडेवारी पाहता असे दिसून येते की, ७५ टक्के लोक राज्य सरकारच्या कामकाजाबाबत समाधानी आहेत.
‘जातजनगणना हा देशाचा एक्स-रे’
ब्यौहारी (मध्य प्रदेश) : जातनिहाय जनगणना हा देशाचा ‘एक्स-रे’ असून, तो ओबीसी, दलित आणि आदिवासींच्या स्थितीवर प्रकाश टाकेल. त्यामुळे हा एक्स-रे काढण्यासाठी आपला पक्ष केंद्रावर दबाव आणेल, असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी येथे म्हटले. मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यातील ब्यौहारी येथील जाहीर सभेत ते बोलत होते.
‘तेलंगणात भाजप सरकार येणार’
केंद्रात भाजप सरकार दमदार काम करत आहे, आता तेलंगणातही भाजप सरकारची गरज आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप तेलंगणात सरकार स्थापन करेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते म्हणाले. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव केवळ आपल्या मुलाला मुख्यमंत्री कसे बनवता येईल, यावर लक्ष देत आहेत.