Bhajanlal Sharma, New Rajasthan CM : राजस्थानमधील नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेन्स अखेर संपला असून सांगानेर मतदारसंघातून आमदार झालेले भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीतील निरीक्षकांनी विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर भजनलाल शर्मा यांचे नाव निश्चित केले. राजस्थानसह तीन राज्यात भाजपाने भरघोस यश मिळवले. त्यानंतर विविध राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी काही नावे चर्चेत होते. काल मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांना 'धक्का' देत मोहन यादव यांना राज्याचे मुख्यमंत्री करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हेच धक्कातंत्र आजही कायम ठेवत भाजपाने राजस्थानमध्येही साऱ्यांना आश्चर्यचकित केले. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे नाव चर्चेत असताना भाजपाकडून भजनलाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
कोण आहेत भजनलाल शर्मा?
भरतपूर येथील रहिवासी भजनलाल शर्मा हे अनेक दिवसांपासून पक्षसंघटनेत कार्यरत आहे. प्रदेश सरचिटणीस म्हणून ते कार्यरत आहेत. भाजपने त्यांना प्रथमच जयपूरच्या सांगानेरसारख्या अतिशय सुरक्षित आणि भाजपाच्या हक्क्वाच्या अशा मतदारसंघातून निवडणुकीत उतरवले. तेथून जिंकून ते पहिल्यांदाच आमदार झाले आणि मुख्यमंत्रीपदीही विराजमान झाले. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे, भजनलाल शर्मा पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. ते ४ वेळा प्रदेश सरचिटणीस राहिले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अभाविप यांच्याशी संबंधित आहेत. सांगानेर ही जागा भाजपचा बालेकिल्ला आहे. तेथून भजनलाल शर्मा विजयी झाले. संघटनेतील त्यांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
पर्यवेक्षकांच्या बैठकीत घेतलेला निर्णय
भाजप हायकमांडने केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांना राजस्थानचे निरीक्षक म्हणून नियुक्त केले होते. आज दुपारी तिन्ही नेत्यांनी जयपूरला पोहोचून आमदारांची बैठक घेतली. आज दुपारी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची वसुंधरा राजे यांच्याशी वन टू वन बैठक झाली. दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही राजनाथ सिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यानंतर नावाची घोषणा करण्यात आली.