काँग्रेस-भाजपाच्या लढाईत 'बाप' नावाची चर्चा; राजस्थानात २ जागांवर आघाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2023 12:43 PM2023-12-03T12:43:36+5:302023-12-03T12:44:29+5:30
Rajasthan Election Result Update: राजस्थानात या पक्षाने दोन जागांवर आघाडी घेतली आहे. हा बाप काय प्रकार आहे, याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. खरी लढत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपात असताना हा तिसरा पक्ष कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.
चार राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसला जोरदार धक्के बसले आहेत. राजस्थान आणि छत्तीगड हातचे गेले आहे. मध्य प्रदेशमध्येही गेल्यावेळी काँग्रेसची सत्ता आली होती, परंतू भाजपाने ज्योतिरादित्य शिंदेंना फोडत सत्ता बळकावली होती. गेल्या वेळी जी तिन्ही राज्ये काँग्रेसच्या ताब्यात गेलेली ती सर्व यंदा भाजपाने आपल्या ताब्यात घेतली आहेत. परंतू, या निवडणुकीत राजस्थानात बाप नावाची चर्चा रंगू लागली आहे.
(मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!)
राजस्थानात या पक्षाने दोन जागांवर आघाडी घेतली आहे. हा बाप काय प्रकार आहे, याची उत्सुकता साऱ्यांना लागली आहे. खरी लढत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपात असताना हा तिसरा पक्ष कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. एक्झिट पोलमध्ये देखील बापला जागा मिळत असल्याचे दर्शविण्यात आले होते.
या पक्षाचे असपूरमधून उमेश मीना आणि चोरसीमधून राजकुमार रोट हे आघाडीवर आहेत. भारत आदीवासी पार्टी असे या पक्षाचे नाव आहे. काही वेळापूर्वी चार जागांवर बापने आघाडी घेतली होती. तीन महिन्यांपूर्वीच या पक्षाची स्थापना झाली होती. या पक्षात राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील हजारो आदिवासी समुदायाचे सदस्य सहभागी झाले होते. या पक्षाचे अध्यक्ष मोहनलाल रोट हे आहेत.
हा पक्ष भारतातील आदिवासी समुदायांच्या हक्कांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे. 2020 च्या राजकीय संकटाच्या वेळी काँग्रेसला पाठिंबा देण्यावरून भारतीय आदिवासी पक्ष (BTP) अंतर्गत वादंग झाला होता. यानंतर मोहनलाल हे वेगळे झाले होते. बीटीपी हा मुळची गुजरातचा पक्ष आहे.
बापने यावेळी आदिवासी बहुल भागांना लागून असलेल्या २५ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले होते. यामध्ये राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती भागाचा समावेश होता. राजकुमार रोट हे २०१८ मध्ये भाजपामधून आमदार झाले होते. आता ते बाप पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.