Rajasthan Assembly Elections: निवडणूक आयोगाने सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची अखेर निवडणूक आयोगाकडून घोषणा करण्यात आली. नोव्हेंबर २०२३ मध्ये या ५ राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. छत्तीसगडमध्ये २ टप्प्यात, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणामध्ये १ टप्प्यात मतदान होणार आहे. मध्य प्रदेशात २३० जागांसाठी ७ नोव्हेंबरला, राजस्थानात २०० जागांसाठी २३ नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये ११९ जागांसाठी ३० नोव्हेंबरला आणि मिझोरममध्ये ४० जागांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर छत्तीसगडमध्ये ९० जागांसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान ७ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान १७ नोव्हेंबरला होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत भाजपाने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. राजस्थानबाबत बोलायचे झाले तर भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत 41 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशच्या उपक्रमाची पुनरावृत्ती पक्षाने राजस्थानमध्येही केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीत ७ खासदारांना रिंगणात उभे केले आहे.
भाजपच्या पहिल्या यादीत अनेक माजी आमदारांना स्थान देण्यात आले आहे. या यादीत विधानसभेसाठी खासदार रिंगणात उतरले आहेत. निवडणुकीपूर्वीच भाजप आपल्या दिग्गज खासदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवू शकते, अशी चर्चा होती. ती चर्चा खरी ठरताना दिसली. भाजपच्या पहिल्या यादीत राज्यवर्धन सिंह राठोड, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, डॉ. किरोरी लाल मीना, भगीरथ चौधरी, देवजी पटेल आणि नरेंद्र कुमार यांना खासदार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे. विद्याधरनगरमधून खासदार दिया कुमारी यांना तिकीट देण्यात आले आहे. तिजारा येथून खासदार बालकनाथ यांना रिंगणात उतरवले आहे. राज्यवर्धन सिंह राठोड झोटवाडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.