राजस्थानात प्रचार टीपेला; आदिवासींच्या अधिकारावरुन एकमेकांवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 06:32 AM2023-11-22T06:32:58+5:302023-11-22T06:33:39+5:30
प्रमुख मुद्दे : लाल डायरी, आदिवासींचे अधिकार अन् जातीय जनगणना
जल, जंगल व जमिनीचे गैरव्यवहार उलगडणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : सध्या राजस्थानमध्ये लाल डायरीची जोरात चर्चा सुरू होणार आहे. डायरीतील पाने जसजशी उलगडत जात आहेत, तसतसे जादूगाराच्या चेहऱ्यावरील तेज हरपत चालले आहे.
काँग्रेसने पाच वर्षांत राज्यातील जल, जंगल आणि जमीन कोणाला कशी विकली, हे डायरीत स्पष्टपणे लिहिले आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली.
राजस्थानच्या अंता येथील प्रचारसभेला मोदी यांनी संबोधित केले. ते म्हणाले, आम्ही विकसित देशाचे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवले आहे. राजस्थानचा विकास झाल्याशिवाय देश विकसित होऊ शकत नाही. परंतु मागील ५ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारच्या भ्रष्टाचारामुळे राजस्थान पीछाडीवर गेले आहे.
तुमचे स्वप्न, माझा संकल्प
nराज्यात भाजपचे सरकार आल्यास भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले. विकसित राज्याचे तुमचे स्वप्न हे मोदींचा संकल्प आहे.
nविविध कल्याणकारी योजनांपासून राज्यातील कुणीही वंचित राहणार नाही. तुम्हाला लुटणारा भ्रष्टाचारी वाचणार नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले.
देशाच्या विकासात भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण हे तीन प्रमुख अडथळे आहे, परंतु काँग्रेस सरकार त्याशिवाय कामच करू शकत नाही. राज्यात गुन्हेगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले. पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.
जल, जंगल व जमिनीचे हक्क मिळवून देणार
लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : आदिवासींच्या अधिकार आणि हक्कासाठी केवळ काँग्रेस पक्षच कटिबद्ध आहे. जोपर्यंत काँग्रेस आहे, तोपर्यंत त्यांच्या अधिकारांचे रक्षण करू. आदिवासींच्या मुलांना शिक्षण, मोफत आरोग्य सुविधा दिली जाईल. जल, जंगल आणि जमिनीवरील आदिवासींचे हक्क आणि अधिकार त्यांना मिळवून देणार, असे आश्वासन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उदयपूर येथील प्रचारसभेत दिले.
राहुल गांधी म्हणाले, एखाद्या जातीचे देशात किती प्रमाण आहे, ते कळालेच नाही तर त्यांचे अधिकार, विकासातील वाटा, याबाबत कसे कळणार? जात जनगणना हा देशाचा एक्स-रे आहे. काँग्रेस सरकार पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात तसेच केंद्रातही काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात जात जनगणना केली जाईल.
भाजपचे इंजिन हाेणार फेल : सचिन पायलट
nकाॅंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी कामा येथील एका प्रचारसभेत भाजपचे इंजिन फेल हाेतील, असा दावा करुन जाेरदार टीका केली.
nभाजपकडून नेहमी डबल इंजिन सरकारचा दावा केला जाताे. हा दावा कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात फसला आहे. आता राजस्थान आणि मध्य प्रदेशातही फेल हाेईल, असे पायलट म्हणाले.
उत्तराखंडमध्ये मजूर बाेगद्यात अनेक दिवसांपासून अडकले आहेत. परंतु, प्रसार माध्यमांमध्ये २४ तास फक्त क्रिकेटबद्दल बाेलले जात आहे. चांगले आहे का? दाेन मिनिटे आमच्या कामगारांना तर द्या, असे सांगून राहुल गांधी यांनी या घटनेकडे लक्ष वेधले.