केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना - गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:14 AM2023-11-20T08:14:58+5:302023-11-20T08:15:40+5:30
राजस्थानातील सभेत राहुल गांधी यांचा शब्द
बुंदी/दौसा : देशात जातनिहाय जनगणना न केल्याबद्दल केंद्रातील सरकारवर टीका करताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी येथे सभेत लोकांना शब्द दिला की, केंद्रात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यास जातनिहाय जनगणना केली जाईल. बुंदी येथील सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, गरीब, शेतकरी आणि मजूर ही भारत माता आहे. जातनिहाय जनगणनेबद्दल ते म्हणाले की, केंद्रातील सरकार जातनिहाय जनगणना करू शकत नाही. हे काम काँग्रेसच करू शकते.
राजस्थानमध्ये भाजपची सत्ता आल्यास गेहलोत सरकारने सुरू केलेल्या सर्व लोककल्याणकारी योजना बंद केल्या जातील. राहुल गांधी म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीर या भारत जोडो यात्रेदरम्यान आपण हजारो तरुणांशी संवाद साधला. या तरुणांनी त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे असल्याचे सांगितले. ९० आयएएस अधिकाऱ्यांसह देश चालविला जात असून, त्यापैकी केवळ तीनच ओबीसी अधिकारी असल्याचा दावा राहुल यांनी केला. त्यामुळे जात जनगणना ही देशाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची आहे आणि आम्ही ती करू, असे राहुल म्हणाले.
शेतकरी, मजुरांचे सरकार बनवा
आदिवासींबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस त्यांना आदिवासी म्हणते; पण केंद्र सरकारमधील सत्ताधारी त्यांना वनवासी म्हणतात.
राजस्थानमध्ये गरीब, शेतकरी, मजूर आणि छोटे व्यापारी यांचे सरकार बनवा. मी तुम्हाला हमी देतो की, केंद्रात सत्तेत आल्यास जातनिहाय गणना केली जाईल.
इंग्रजी माध्यमातील शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना राहुल गांधी म्हणाले की, राजस्थान सरकारने राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या आहेत. जेणेकरून गरीब, शेतकरी आणि मजुरांच्या मुलांना त्यात शिक्षण घेता येईल. गरिबांच्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिक्षण मिळावे, असे भाजपला वाटत नाही.