राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदावरून राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या नावावरून अद्याप सस्पेंस आहे. राजस्थानमध्ये उद्या विधीमंडळ पक्षासोबत निरीक्षकांची बैठक होणार आहे. मात्र, यादरम्यान येणाऱ्या बातम्यांवरून येथील नेत्यांच्या बाजूने लॉबिंग सुरू झाल्याचा दावा केला जात आहे. कोटा उत्तरचे पराभूत उमेदवार प्रल्हाद गुंजाळ हे स्वतः वसुंधरा राजे यांच्या बाजूने लॉबिंग करण्यात व्यस्त आहेत.
दुसरीकडे, राजस्थानचे विरोधी पक्षनेते राहिलेले राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजे यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्या नावावर निवडणूक जिंकली असा कोणताही गैरसमज नसावा, राजस्थानमधील विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर मिळाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. भाजपने 199 पैकी 115 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला आहे. तेव्हापासून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत चर्चा सुरू आहे.
राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, गजेंद्र सिंह शेखावत, सीपी जोशी यांच्यासह अनेक नावे मुख्यमंत्रीपदासाठी दावेदार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये वसुंधरा राजे या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र, भाजपने अद्याप कोणाच्याही नावाला मान्यता दिलेली नाही. हायकमांडने येथे निरीक्षक पाठवले आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सरोज पांडे आणि विनोद तावडे यांचा समावेश आहे. उद्या निरीक्षक आमदारांची बैठक घेऊ शकतात, असे म्हटले जात आहे.
कोटा उत्तरमधून निवडणुकीत पराभूत झालेले प्रल्हाद गुंजाळ हे मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांचा प्रचार करत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रल्हाद गुंजाळ जयपूरमध्ये पक्षाच्या बड्या नेत्यांची भेट घेत आहेत. तसेच, प्रल्हाद गुंजाळ हे सातत्याने वसुंधरा राजे यांच्या बाजूने नेत्यांचा पाठिंबा मागत आहेत. यापूर्वी एका आमदाराच्या वडिलांनीही वसुंधरा राजे यांच्या मुलावर आमदारांना रोखल्याचा आरोप केला होता.
राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजेंवर साधला निशाणा राजस्थानमधील विरोधी पक्षनेते राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राठोड यांनी वसुंधरा राजे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते सोमवारी म्हणाले की, राजस्थानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर पक्षाचा विजय झाला आहे. आपल्या नावावर निवडणूक जिंकली असा गैरसमज इथे कोणीही ठेवू नये, असे ते म्हणाले. दरम्यान, हे विधान अशावेळी आले आहे, जेव्हा राजस्थानचा मुख्यमंत्री चेहरा जाहीर होणार आहे. याठिकाणी वसुंधरा राजेंचे समर्थन करणाऱ्या आमदार आणि नेत्यांवरही लॉबिंगचे आरोप झाले आहेत.