कोटा - राजस्थानच्या कोटा शहरातील समस्येचा प्रश्न घेऊन येथील आमदाराने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. रामगंजमंडी येथील आमदार मदन दिलावर यांनी जिल्हाधिकारी यांचं लक्ष वेधत केलेल्या कृतीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कोटा शहरातील दूषित पाण्याचा मुद्दा घेऊन ते कलेक्टर कार्यालयात पोहोचले. पण, यावेळी, त्यांनी बोऱ्या-बिस्तारा म्हणजे अंथरुण-पांघरुणही सोबत घेतले होते. या घटनेमुळे जिल्हाधिकारी परिसरात चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. जिल्हाधिकारी ओपी बुनकर व आमदार मदन दिलावर यांच्याच बराच वेळ चर्चा झाली.
शहरातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आमदार महाशयांनी चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातच मुक्काम ठोकण्याचा विचार केला. त्यासाठी, ते अंथरुण-पांघरुन घेऊन कार्यालयात पोहोचले. त्यामुळे, जिल्हाधिकारी यांनी तात्काळ त्यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली. चर्चेअंती दूषित पाण्यासंदर्भात तपास करण्याचं आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्त्यांसह ते तिथून परत फिरले.
कोटा दक्षिण क्षेत्रातील PHED च्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ठेकेदारांकडून दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. तरीही, PHED चे अधिकारी दूषित पाण्याचा तपास करत नाहीत. विशेष म्हणजे गेल्यावर्षी दूषित पाण्यामुळे १० ते १२ जणांचा मृत्यू झाला होता. तसेच, अनेकजण आजारीही पडले होते. त्यामुळे, आमदार दिलावर कलेक्टर ऑफिसला पोहोचले होते. शहरातील धनराज चेची यांचा पाणीपुरवठा यंत्रणेवर कब्जा आहे. मात्र, अधिकारी काहीही कारवाई करत नाहीत. त्यामुळे, आमदार दिलावर यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून अधिकारी व पाणी पुरवठा ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.