“...तर राजस्थानमध्ये काँग्रेसचे काही खरे नाही”; अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 05:56 PM2023-11-30T17:56:03+5:302023-11-30T17:56:49+5:30
CM Ashok Gehlot On Rajasthan Assembly Election Result 2023: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी तीन कारणे सांगितली आहेत.
CM Ashok Gehlot On Rajasthan Assembly Election Result 2023: देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या. यामध्ये राजस्थानचा समावेश आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस आणि भाजप यांच्यात कडवी टक्कर होऊ शकते, असे म्हटले जात आहे. ०३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
एक्झिट पोल काहीही सांगत असले तरी राजस्थानमध्ये काँग्रेसच सरकार स्थापन करेल. भाजप ५ पैकी एकाही राज्यात विजयी होणार नाही. राजस्थानची जनता काँग्रेसला पुन्हा एकदा संधी देईल आणि आमचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त करताना, याची तीन कारणे अशोक गेहलोत यांनी सांगितली. पहिले कारण म्हणजे काँग्रेसविरोधात किंवा आमच्या सरकारविरोधी लाट नाही, असेही जाणकार सांगत आहेत. दुसरा म्हणजे मुख्यमंत्री. मुख्यमंत्र्यांनी विकासकामे करण्यात कोणतीही कसर ठेवलेली नाही, असे भाजपचे मतदारही म्हणतील. तिसरी म्हणजे पंतप्रधान, गृहमंत्री, भाजपचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांनी प्रचारादरम्यान ज्या भाषेचा वापर केला ती कोणालाही आवडलेली नाही, असे अशोक गेहलोत यांनी नमूद केले.
...तर राजस्थानमध्ये काँग्रेसचे काही खरे नाही
निवडणुकीत भाजपने धर्माच्या नावाखाली भीतीदायक आणि तणावपूर्ण गोष्टी पसरवल्या आहेत. भाजपचे धर्माचे कार्ड चालले तर वेगळी बाब आहे. मग काही खरे नाही. भाजपचे धार्मिक कार्ड चालले नाही तर सरकार स्थापन करू, असा विश्वास अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला. तसेच सर्वेक्षणांमध्ये काही आले तरी राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन होणार आहे. भाजप नेते लोकांसमोर सूडबुद्धीची भाषा बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी धर्माच्या नावावर ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अशोक गेहलोत यांनी केला.
दरम्यान, राजस्थानमध्ये २५ नोव्हेंबरला विधानसभेच्या २०० जागांसाठी मतदान झाले होते. राजस्थानमध्ये गेल्या ३० वर्षांपासून प्रत्येक वेळी सरकार बदलण्याचा ट्रेंड आहे. १९९३ मध्ये भाजपने येथे विजय मिळवला होता. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या निवडणुकीत जनतेने काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. ५ वर्षानंतर २००३ मध्ये जनतेने पुन्हा भाजपला विजय मिळवून दिला. यानंतर २००८ मध्ये काँग्रेस, २०१३ मध्ये भाजप आणि २०१८ मध्ये काँग्रेस विजयी झाली. राजस्थानमध्ये तीस वर्षांपासून सुरू असलेला ट्रेंड यावेळीही कायम राहणार की बदलणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.