CM Eknath Shinde In Rajasthan: शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक बंडखोरी करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावरच दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिले. यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. केवळ ठाकरे गटातील नाही तर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट राजस्थानात जाऊन काँग्रेसला खिंडार पाडले. काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानात जाऊन काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला. राजस्थानात काँग्रेसची सत्ता असून, तेथील एका बड्या नेत्याने शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशासाठी एकनाथ शिंदे स्वतः राजस्थानात गेले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजस्थानात काँग्रेसला मोठे खिंडार पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रानंतर आता राजस्थानातही शिंदे गटाची ताकद वाढताना दिसत आहे.
काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस नेते राजेंद्र गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत राजस्थानच्या झुनझुनमध्ये गेले होते. यावेळी झालेल्या जाहीर आणि भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी गुढा यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांच्या हातात शिवधनुष्य देऊन त्यांना शिवसेनेत घेतले. इथेही उद्योगधंदे येतील. रोजगार मिळतील अशी आशा आहे. मी तुमचा हात धरला आहे. इथे बाण चालेल. जोरदार चालेल. शिवाजी महाराज आणि महाराणा प्रतापाच्या विचाराने आपण काम करू. या राज्यात शिवसेना पसरवू. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले आहे. तुमचे स्वागत आणि अभिनंदन आहे, असे राजेंद्र गुढा यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, राजेंद्र गुढा यांचे शिवसेनेत स्वागत आहे. त्यांनी एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. राजस्थान ही वीरांची भूमी आहे. इथल्या जनतेला नमन करतो, अभिवादन करतो. आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि इथे महाराणा प्रताप यांचे नाव गाजले आहे. राजस्थान आणि महाराष्ट्राचा स्वभाव गुण एकसारखा आहे. तो म्हणजे वीरता, शूरता, एकसमानता हा होय. आता या गुणाचे मिलन झाले. तुम्ही मंत्रीपद सोडले. पण सत्य सोडले नाहीत, यासाठी तुमचे कौतूक. तुम्ही जसे मंत्रीपद त्यागले, तसेच मी सत्ता सोडली. मंत्रीपद सोडले आणि केवळ बाळासाहेबांच्या विचारांसाठी सत्येचा त्याग केला, आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने चालतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.