राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. नागौर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी खासदार ज्योती मिर्धा यांनी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांनी नवी दिल्लीत ज्योती मिर्धा यांच्या पक्षात समावेशाची औपचारिकता पूर्ण केली.
ज्योती मिर्धा या राजस्थानमधील मोठ्या राजकीय कुटुंबातील आहेत. ज्योती मिर्धा या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत नथुराम मिर्धा यांची नात आहेत. नथुराम मिर्धा हे राज्यातील जाट समाजाचे मोठे नेते होते. जाट व्होट बँकेवर त्यांची मजबूत पकड होती. त्यामुळे ज्योती मिर्धा यांचा पक्षात समावेश करून भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या जाट व्होटबँकेला मोठा धक्का दिला आहे.
नागौर लोकसभा मतदारसंघातून भाजप ज्योती मिर्धा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवू शकते. ज्योती मिर्धा २००९ मध्ये खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, २०१४ मध्ये भाजपच्या सी.आर. चौधरी आणि २०१९ मध्ये राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाच्या हनुमान बेनिवाल यांच्याकडून त्या निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. ज्योती मिर्धा भाजपमध्ये सामील झाल्याने काँग्रेस आणि भाजपची राजकीय समीकरणे बदलली आहेत. तसेच, नागौरची जागा आता बेनिवाल यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या अवघड बनली आहे.
सवाई सिंह चौधरी यांनीही भाजपमध्ये केला प्रवेश ज्योती मिर्धा यांच्यासोबत भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी सवाई सिंह चौधरी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. सवाई सिंह यांनी मागील विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. दुसरीकडे, विधानसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांच्या निवडीसाठी काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीने सोमवारीही प्रक्रिया सुरू ठेवली. समितीचे अध्यक्ष गौरव गोगई यांच्या अध्यक्षतेखाली स्क्रीनिंग समितीने मागील दोन निवडणुकांमध्ये सातत्याने पराभूत झालेल्या २६ विधानसभा जागांसाठीच्या संभाव्य उमेदवारांबाबत ब्लॉक अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांकडून अभिप्राय घेतला. जयपूरमधील काँग्रेसच्या वॉर रूममध्ये ही बैठक झाली.