Rajasthan Lok Sabha Election 2024: आगामी काहीच दिवसांत लोकसभा निवडणूक जाहीर होऊन आचारसंहित लागू शकते, असे अनेक कयास बांधले जात आहेत. काहीच दिवसांवर लोकसभा निवडणूक येऊन ठेपली आहेत. काही पक्षांची उमेदावारी यादी जाहीर झाली असून, अनेक पक्षांचे जागावाटपाबाबत बैठकांचे सत्र सुरू आहे. यातच राजस्थानमधील लोकसभेच्या सर्व २५ जागा काँग्रेस पक्ष जिंकेल, असा मोठा दावा एका नेत्याने केला आहे.
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसलाराजस्थानमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपाने जोरदार विजय मिळवला. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. असे असले तरी लोकसभेत काँग्रेस बाजी मारेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना माजी मंत्री शकुंतला रावत यांनी मोठा दावा केला आहे. राजस्थानमधील लोकसभेच्या जागांसाठी काँग्रेसचे उमेदवार लवकरच जाहीर केले जाणार आहेत. राजस्थानमध्ये २५ पैकी २५ जागा काँग्रेस जिंकेल. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे, असे शकुंतला रावत यांनी म्हटले आहे.
भाजपावर केली टीका
राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे. या यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता संपूर्ण देशातील वातावरण बदलत असल्याचे चित्र आहे. गेल्या १० वर्षांपासून भाजपा सरकार केवळ घोषणा करण्यातच पहिल्या क्रमांकावर आहे. आता राजस्थानमध्ये भाजपाचे सरकार आल्याने जनतेसाठी असलेल्या सर्व योजना रखडल्याची भावना लोकांमध्ये आहे. आमच्या जनकल्याणकारी योजना भाजपा सरकारने थांबवल्या आहेत. सरकारच्या कामाची गती मंदावली आहे, अशी टीका रावत यांनी केली.
दरम्यान, भाजपा संपूर्ण देशात धर्माच्या नावावर काम करत आहे. भाजपा दररोज अशा घोषणा करत आहे, ज्या कधीच पूर्ण होणार नाहीत. भाजपाकडे निवडणूक लढवण्याचा कोणताही मुद्दा किंवा योजना नाही. भाजपावाले आपल्या भाषणात काही दावे करू शकतात. ४०० पार काहीच नाही, असा टोला शकुंतला रावत यांनी लगावला.