“महिला आरक्षण लागू करायला केंद्र १० वर्षे लावेल, काँग्रेस सत्तेत येताच...”: मल्लिकार्जुन खरगे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 03:23 PM2023-09-24T15:23:30+5:302023-09-24T15:24:53+5:30

Women Reservation Bill: भाजपला खरे तर महिलांना आरक्षण द्यायचेच नाही, असे सांगत काँग्रेस सत्तेत आल्यावर महत्त्वाच्या सुधारणा करू, असे आश्वासन अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी दिले.

congress president mallikarjun kharge criticised central modi govt over women reservation bill | “महिला आरक्षण लागू करायला केंद्र १० वर्षे लावेल, काँग्रेस सत्तेत येताच...”: मल्लिकार्जुन खरगे

“महिला आरक्षण लागू करायला केंद्र १० वर्षे लावेल, काँग्रेस सत्तेत येताच...”: मल्लिकार्जुन खरगे

googlenewsNext

Women Reservation Bill: केंद्र सरकारने विशेष अधिवेशन घेत महिला आरक्षण विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत पारित केले. मात्र, यावरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करत आहेत. महिला आरक्षण विधेयकात गुंतागुंत आहे. महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यास केंद्र सरकार १० वर्षे लावेल. परंतु, काँग्रेस सत्तेत येताच या विधेयकात आवश्यक सुधारणा करून तत्काळ अंमलबजावणीसाठी प्रयत्न करू, असा दावा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. तसेच यावेळी केंद्र सरकारवर निशाणाही साधला.

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस केंद्रात सत्तेवर आल्यास महिला आरक्षण विधेयकात सुधारणा करेल. या विधेयकाच्या तत्काळ अंमलबजावणीत कोणतीही मोठी कायदेशीर गुंतागुंत नसताना मोदी सरकार मात्र या विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी आगामी १० वर्षे प्रतीक्षा करायला लावणार आहे, असा दावा खरगे यांनी केला. जयपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात खरगे बोलत होते. संसदेत या विधेयकाला पाठिंबा देताना काँग्रेसने ते तत्काळ लागू करण्याची मागणी केली होती. तसेच त्यात इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिलांसाठी वेगळे आरक्षण असावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.  केंद्रात २०२४ मध्ये आमचे सरकार जेव्हा येईल, तेव्हा आम्ही सर्वप्रथम या विधेयकात तशी सुधारणा करू, अशी ग्वाही खरगे यांनी दिली. 

भाजपला खरे तर महिलांना आरक्षण द्यायचेच नाही

केंद्र सरकारने  अनुसूचित जाती-जमातींना काय महत्त्व दिले? लोकसभा अधिवेशन पंतप्रधान नव्हे तर राष्ट्रपती बोलावतात. पण राष्ट्रपतींनाच येथे आदराचे स्थान नाही. आम्ही महिलांचा खूप आदर करतो, असा मोदींचा दावा कशाच्या आधारे आहे? संसदेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते, कलाकारांसह इतर अनेकांना आमंत्रित करण्यात आले होते पण राष्ट्रपतींना आमंत्रण नव्हते. हा त्यांचा अपमान आहे. भाजपला खरे तर महिलांना आरक्षण द्यायचेच नाही. भाजपने निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण विधेयक आणले. कारण अनेक विरोधी पक्षांनी मिळून ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली आहे. जेव्हा राहुल गांधी, सोनिया गांधी आणि आम्ही मिळून विरोधी पक्षांची आघाडी ‘इंडिया’ची स्थापना केली तेव्हा भाजपच्या मनात महिला विधेयक आले, या शब्दांत खरगे यांनी केंद्र सरकावर हल्लाबोल केला. 

दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा भाजपची कोणतीही महिला अध्यक्ष झाली आहे का? संघाच्या उच्च पदापर्यंत कोणतीही महिला पोहोचली आहे का? काँग्रेस हाच महिलांचा खरा आदर करणारा पक्ष आहे. काँग्रेसच्या काळात पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू होत्या, विजयालक्ष्मी पंडित संयुक्त राष्ट्रांत होत्या, मीरा कुमार लोकसभेच्या अध्यक्ष होत्या, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील होत्या, असे खरगे यांनी सांगितले.


 

Web Title: congress president mallikarjun kharge criticised central modi govt over women reservation bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.