लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर : ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येते, त्या राज्यांमध्ये भ्रष्टाचारी, गुन्हेगार, दंगलखोरांना मुक्त वातावरण मिळते. काँग्रेसमुळेच राजस्थान हे देशात भ्रष्टाचार, दंगली, गुन्हेगारीमध्ये अग्रेसर राज्य ठरले आहे. तुष्टीकरणासाठीच ते काम करत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. भरतपूर येथील भाजपच्या ‘विजय संकल्प सभेला’ ते संबोधित करत होते.
एकीकडे भारत देश जागतिक महासत्तेच्या दिशेने प्रवास करत आहे, तर दुसरीकडे राजस्थानात गेल्या पाच वर्षांमध्ये काय झाले? या काळात राजस्थानचे जे नुकसान झाले, त्यास कोण जबाबदार आहे? मागील पाच वर्षांमध्ये होळी असो, रामनवमी असो वा हनुमान जयंती, कोणताही सण येथील नागरिक शांततेत साजरे करू शकले नाही. सणासुदीच्या काळात राज्यात दंगली, दगडफेक, संचारबंदी लावण्यात आली, असे मोदी म्हणाले.
दिलेली आश्वासने पूर्ण करणारचराजस्थानला प्रगतिपथावर नेण्याचा संकल्प भाजपने केला आहे. दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्याची हमी मी देतो, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी आश्वासित केले.
जादूगर होईल छू-मंतरकाही लोक स्वतःला जादूगर समजतात. परंतु निकालावेळी लोकच म्हणतील, ‘३ डिसेंबर, काँग्रेस छू-मंतर. अशी टीका मोदींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर केली.
राजस्थानात पेट्रोल महाग का? राजस्थानचे शेजारी राज्य असलेल्या हरयाणा, मध्य प्रदेश तसेच गुजरातमध्ये पेट्रोल ९७ रुपये लिटर मिळते, मग राजस्थानमध्ये ते १०९ रुपयांना कसे काय मिळते? येथील काँग्रेस सरकार लिटरमागे तुमच्या खिशातून १२ रुपये काढते. भाजपची सत्ता आल्यास काँग्रेसचा हा खेळ बंद होईल, असेही मोदी म्हणाले.
‘तुम्ही कितीही प्रयत्न करा; सत्तेवर काँग्रेसच येईल’ जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीही प्रयत्न केले, तरी राजस्थानमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसच सरकार स्थापन करेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. श्रीमंतांना अधिक श्रीमंत आणि गरिबांना अधिक गरीब करण्याचे काम भाजप करत असल्याची टीकाही त्यांनी केली. भरतपूर जिल्ह्यातील वैर येथील सभेला ते संबोधित करत होते.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी काम केले, तर भाजपचे नेते म्हणतात की ही रेवडी योजना आहे. आम्ही तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले, पण तुम्ही तर श्रीमंतांचे १५ कोटींचे कर्ज माफ करण्याचे काम केले. अग्निवीर योजनेतून केंद्र सरकार देशभरातील युवकांची फवसणूक करत असल्याचेही खरगे यांनी नमूद केले.