देशातील ५ राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत भाजपला दैदिप्यमान यश मिळालं. त्यामुळे, ५ पैकी ३ राज्यात भाजपाने सरकार स्थापन केलं आहे. मात्र, तिन्ही राज्यात भाजपाने मुख्यमंत्रीपदासाठी धक्कातंत्र वापरलं. विशेष म्हणजे राजस्थानमध्येमुख्यमंत्री कोण होणार, यावर मोठं मंथन झालं. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अनेक नावे पुढे येत होती. त्यापैकी, एक नाव म्हणजे महंत बालकनाथ. उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ यांच्यासोबतही त्यांची तुलना झाली. पण, भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी नावाची घोषणा झाल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या.
राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी वसुंधरा राजे यांची मोठी लॉबिंग आणि नाव चर्चेत होतं. मात्र, त्यांनीच काढलेल्या चिठ्ठीत भजनलाल शर्मा याचं नाव पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. राजस्थानसह देशभरात भाजपाने हा मास्टरस्ट्रोक खेळला होता. त्यानंतर, राजस्थानच्या भजनलाल शर्मा यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. मात्र, या मंत्रिमंडळातही बालकनाथ यांना स्थान मिळालं नाही. ज्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होतं. वसुंधराराजे यांच्याशी ज्यांची स्पर्धा समजली जात होती. त्या, बालकनाथ यांना साधे मंत्रिमंडळातही स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाजपाने राजस्थान विधानसभा निवडणुकीत महाराणी दीया कुमारी, राज्यवर्धन सिंह राठोड, देवजी पटेल, नरेंद्र खीचड, भगीरथ चौधरी आणि बाबा बालकनाथ यांच्यासह एकूण ७ खासदारांना मैदानात उतरवले होते. हरियाणाच्या रोहतक येथील बाबा मस्तनाथ पीठाचे महंत बालकनाथ योगी हेही तिजारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. बाबा बालकनाथ हेही त्याच संप्रदायातून येतात, जेथून युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येतात. राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या एक्झिट पोलमध्ये बाबा बालकनाथ यांचं नाव दुसऱ्या स्थानावर होतं. मात्र, भजनलाल शर्मा यांच्या कॅबिनेटमध्ये बाबा बालकनाथ यांना स्थान न मिळाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
जातनिहाय गणितांसह संत समाजातील मतांच्या टक्केवारीच्या गणितामुळेच बाबा बालकनाथ यांना स्थान मिळाले नसावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. बालकनाथ यांचे मंत्रिमंडळातील स्थान मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्यावरील फोकस कमी करणारे ठरले असते, असाही अंदाज व्यक्त होत आहे. तसेच, संत बालकनाथ यांच्यासह संत परंपरेतील आणखी दोन आमदार आहेत. त्यामुळे, पुढे त्यांनाही मंत्रीपदाच्या शर्यतीत ठेवावे लागले असते. म्हणून भाजपाने बाबा बालकनाथ यांना मंत्रीपदापासून दूर ठेवल्याचं सांगितलं जात आहे.