Rajasthan Lok Sabha Election 2024: राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चितपट केल्यानंतर आता भाजपासमोर लोकसभा निवडणुकीत हीच लय कायम ठेवण्याचे आव्हान आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सर्वच जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. आता पुन्हा तशीच कामगिरी भाजपा राजस्थानात करणार का, याकडे लक्ष लागले आहे. एकीकडे एक एक जागा जिंकण्यासाठी धडपड सुरू असतानाच आम्हाला मते देऊ नका, असा प्रचार करण्याची वेळ काँग्रेसवर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांसवाडा, डुंगरपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेससमोर विचित्र परिस्थिती आली आहे. या ठिकाणी काँग्रेसने भारत आदिवासी पक्षासोबत आघाडी केली आहे. मात्र, इच्छुक अरविंद डामोर यांनी केलेल्या एका खेळीमुळे काँग्रेसचीच अवस्था कठीण झाली आहे. बांसवाडा डुंगरपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसने अर्जुन बामनिया यांना तिकीट दिले. मात्र अर्जुन बामनिया यांच्या जागी अरविंद डामोर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी काँग्रेसने भारत आदिवासी पक्षासोबत आघाडी जाहीर केली आणि राजकुमार रोत यांना पाठिंबा दिल्याचे घोषित केले. मात्र, पक्षाच्या निर्णयाने नाराज झालेल्या अरविंद डामोर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. या कृतीमुळे काँग्रेसने डामोर यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. काँग्रेसने हकालपट्टी केली असली तरी, अरविंद डामोर यांच्याकडे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला मते देऊ नका
या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसच्या चिन्हावर लढत असलेल्या अरविंद डामोर यांना मते देऊ नका, असा प्रचार आता काँग्रेसकडून केले जात आहे. तसेच या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भारत आदिवासी पक्षासोबत आघाडी केली असून, राजकुमार रोत यांना पाठिंबा दिला आहे, असा प्रचार काँग्रेसने सुरू केला आहे. मात्र, यासाठी काँग्रेसला धावाधाव करावी लागत आहे. काँग्रेसने यावरच आता भर दिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, बांसवाडा डुंगरपूर येथे काँग्रेसची फजिती झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. एकीकडे काँग्रेसने भारत आदिवासी पक्षासोबत युती करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले अरविंद डामोर यापुढेही काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. या सगळ्या प्रकारामुळे या भागातील निवडणुकीत गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र आहे. आता अरविंद डामोर काँग्रेसच्या चिन्हावर मते मागणार आणि काँग्रेस आघाडीचा हवाला देत राजकुमार रोत यांच्या बाजूने मते मागणार, असा संभ्रम जनतेत आहे.