अग्निपथ योजनेमुळे युवकांचा स्वप्नभंग; योजनांद्वारे आरोप-प्रत्यारोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 04:13 AM2023-11-23T04:13:56+5:302023-11-23T04:14:50+5:30
डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : काँग्रेसने दिलेल्या खोट्या आश्वासनांपेक्षा भाजपने दिलेले वचन वरचढ आहे आणि ते पूर्ण करण्याची मोदींची गॅरंटी आहे. सत्ताधारी काँग्रेसने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करताना मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली. डुंगरपूर येथील सभेत ते बोलत होते.
मोदी म्हणाले, काँग्रेसने दिलेले आश्वासन हे गरीब कल्याण, जनकल्याण यासारख्या विषयांपर्यंत मर्यादित राहतात. आम्ही त्यापलीकडे जाऊन विचार करतो. देशात काँग्रेसने आजवर जेवढे काम केले नाही, त्यापेक्षा कित्येक पट अधिक काम आम्ही मागील १० वर्षांमध्ये केले. राजस्थानमध्येही काँग्रेस सरकारने ५ वर्षांमध्ये काहीच केले नाही.
मावजी महाराजांचा आशीर्वाद...
मावजी महाराजांचा आशीर्वाद घेत
मी एक भविष्यवाणी करू इच्छितो आणि राजस्थानातील लोकांनी ती लिहून घ्यावी की, यावेळीच नव्हे,
तर पुढेही राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांचे सरकार सत्तेवर येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी
यांनी यावेळी म्हटले.
संस्कृतीचा सन्मान हेच ध्येय : शाह
काँग्रेसने केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले, तर भाजप मात्र भारतीय संस्कृतीचा सन्मान करत आहे, असे मत गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.
राहुल गांधी यांचा केंद्र सरकारवर प्रहार
जयपूर : अग्निपथ योजनेच्या माध्यमातून युवकांची सैन्यात भरती केली जात आहे. परंतु, या योजनेच्या माध्यमातून लाखो युवकांचे स्वप्नभंग झाल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली. धोलपूरच्या राजाखेडा येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
केंद्र सरकारने सैन्यभरतीसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, मर्यादित कालावधी झाल्यावर या युवकांनी करायचे काय? त्यांना सैन्यात कायमस्वरूपी घेतले जाणार नसल्याने ही योजना देशातील युवकांचे स्वप्नभंग करणारी आहे, असे राहुल म्हणाले. पंतप्रधान मोदी म्हणतात की, ते ओबीसी आहेत. परंतु, जेव्हा आम्ही जातजनगणनेचा मुद्दा उपस्थित करतो, तेव्हा ते देशात केवळ गरीब ही एकच जात असल्याचे सांगतात. मते मिळविण्यासाठी ओबीसीचा नारा देतात आणि ओबीसींना त्यांच्या हक्काचा वाटा देण्यास नकार देतात.
देशाचा पैसा कुठे चालला?
केंद्र सरकार म्हणते आम्ही लोकांसाठी अनेक योजना राबवतो. विविध योजनांच्या माध्यमातून
पैसा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही.
देशातील पैसा कुठे चालला आहे, हा संशोधनाचा विषय असल्याची टीकाही राहुल यांनी यावेळी केली.
महागाईपासून दिलासा : प्रियंका
देशात महागाई वाढली आहे. परंतु, काँग्रेसच्या कार्यकाळात राजस्थानमध्ये महागाई झळ बसली नाही, असे कॉग्रेस नेत्या प्रियंका गांधी म्हणाल्या.