राजस्थानमध्ये लहान मुलांच्या अन्न घोटाळा प्रकरणात आरोप असणाऱ्यांविरोधात आता ईडीने कारवाई केली आहे. राजस्थान सरकारचे गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या दहा ठिकाणांवर आज ईडीने एकाच वेळी छापे टाकले आहेत. भोजन घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या संदर्भात ईडीने राज्याचे गृहराज्यमंत्री यादव यांच्या जयपूर, बेहरोर आणि विराटनगरसह १० ठिकाणांवर छापे टाकले आहेत. ईडी या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. ईडीच्या या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
"मी पाकिस्तानातून मित्राला भेटायला आलेय"; ट्रेनमध्ये सापडली मुलगी, चौकशीत धक्कादायक खुलासा
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीची टीम सकाळीच राजस्थानला पोहोचली. त्यानंतर कोतपुतलीसह गृहराज्यमंत्री यादव यांच्या अन्य ठिकाणांवर एकाचवेळी छापे टाकण्यास सुरुवात झाली. याप्रकरणी वर्षभरापूर्वी आयकर विभागाच्या पथकाने राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले होते. गृहराज्यमंत्र्यांच्या घरावरही छापे टाकण्यात आले होते.
माध्यान्ह भोजनातील मुलांसाठी पोषक आहार ठरलेल्या दरापेक्षा कितीतरी जास्त दराने खरेदी करण्यात आला. गृहराज्यमंत्री यादव यांच्या कंपन्यांचा यात सहभाग असल्याचे बोलले जात आहे. या घोटाळ्याचा संबंध गृहराज्यमंत्री राजेंद्र यादव यांच्या संबंधीत असल्याने हे प्रकरण चर्चेत आले होते. यावरून त्यावेळीही राजकारण झाले होते. आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेस सरकारच्या मंत्र्यांच्या घरावर टाकलेल्या धाडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकारवर ईडीचा गैरवापर केल्याचा आरोप केला.