Rajasthan Lok Sabha Election 2024: गेल्या सलग दोनवेळा भाजपाने राजस्थानमध्ये सर्व २५ जागा जिंकल्या आहेत. मात्र, आता परिस्थिती वेगळी आहे. आताचे वातावरण काँग्रेससाठीच अनुकूल आहे. काँग्रेसच्या किती जागा येतील, याबाबत सांगू शकत नाही. परंतु, राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल अवाक् करणारे असतील, असा मोठा दावा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे.
राजस्थानमध्ये पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. काँग्रेस असो किंवा भाजपा असो, दोन्ही पक्षाचे स्टार प्रचारक प्रचार कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय पक्षांसोबत स्थानिक पक्षांचाही प्रचार, बैठका घेण्यावर भर दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपाचे जाहीरनामे प्रसिद्ध झाले आहेत. दोन्ही बाजूचे नेते एकमेकांच्या जाहीरनाम्यावर टीका करताना दिसत आहेत. यातच माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांचा कल काँग्रेसकडे असल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसच्या ५ न्याय आणि २५ गॅरंटीवर भाजपा कधी बोलणार नाही
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवणे, राम मंदिर या मुद्द्यांवर बोलताना अशोक गेहलोत म्हणाले की, हे त्यांनी घेतलेले निर्णय आहेत. मात्र, महत्त्वाचा मुद्दा बेरोजगारीचा आहे. भाजपावाले त्यावर काहीच बोलत नाहीत. सत्तेत असलेल्या पक्षाने जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर बोलावे. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात ५ न्याय आणि २५ गॅरंटी दिलेले आहेत. पण भाजपा कधी त्यावर बोलणार नाही. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा प्रभाव आहे, असा आरोप करताना त्यांना नेमके काय म्हणायचे, असा सवाल अशोक गेहलोत यांनी केला.
२०१४ मध्ये दिलेल्या आश्वासनांचे काय झाले?
भाजपाचा संपूर्ण जाहीरनामा वाचलेला नाही. त्यामुळे त्यावर अधिक बोलू शकत नाही. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार होते, तेव्हा अनेक आश्वासने दिली होती. आम्ही काळा पैसा आणू, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये येतील, दोन कोटी नोकऱ्या देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, या गोष्टींचे उत्तर पंतप्रधान मोदींनी आजपर्यंत दिलेले नाही. त्या मुद्द्यांवर चर्चाही होत नाही. जनतेला त्यांचे उत्तर हवे आहे. त्यानंतर २०४७ बाबत विचार करू, अशी टीका अशोक गेहलोत यांनी केली.
दरम्यान, भाजपावाल्यांनी जुनी आश्वासने पूर्ण केली नाहीत. असे असतानाही पुढील २५ वर्षांची चर्चा सुरू केली आहे. या गोष्टीत काही दम नाही. राहुल गांधींच्या दोन यात्रांना मिळालेल्या प्रतिक्रियांच्या आधारे काँग्रेसने प्रयत्न केले आहेत. जनभावनांवर आधारित जाहीरनामा तयार करण्यात आला असून, त्यावर चर्चा सुरू आहे. आम्ही विरोधी पक्षात असलो तरी सांगण्यासारखे खूप आहे. सत्ताधाऱ्यांच्या घोषणा जुन्याच आहेत, या शब्दांत अशोक गेहलोत यांनी निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये २५ जागांसाठी दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या १२ जागांवर १९ एप्रिलला मतदान होणार आहे. २६ एप्रिल रोजी १३ जागांसाठी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी आहे.