Rajasthan Accident: राजस्थान राज्यातील पाली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जैन साधूंचा गट रस्त्यावर उभा होता, यावेळी एक ट्रक साधूंना चिरडून पुढे निघून गेला. या घटनेत अनेकजण जखमी झाले असून, जैन समाजाने याला मोठे षडयंत्र म्हटले आहे. तसेच, कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन भिक्षू तपोरत्न सुरी आचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली जैन साधू आणि इतर लोकांचा गट पालीहून जालोरकडे निघाला होता. यावेळी पाठीमागून एक ट्रक गर्दीत घुसला आणि उभ्या असलेल्या सर्वांना चिरडत पुढे निघून गेला. या अपघातात सुदैवाने कोणाचाही मृत्यू झाला नाही, मात्र दोन महिलांसह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
ही घटना 12 जानेवारी रोजी पाली जिल्ह्यातील तखतगढ भागात घडली. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पोलिसांनी ट्रकचालक आणि ट्रकमालकावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, ट्रक मालकाला अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतरही पोलिसांनी सामान्य कलमान्वये गुन्हा दाखल केल्याचा आरोप जैन समाजाचा आहे.