जयपूर: काँग्रेसचे उमेदवार रुपिंदरसिंह कुन्नर यांनी सोमवारी करणपूर विधानसभा निवडणुकीत भाजपचे मंत्री सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचा ११,२८३ मतांनी पराभव केला. करणपूर गंगानगर मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसचे उमेदवार आणि तत्कालीन आमदार गुरमीतसिंह कुन्नर यांच्या निधनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. या जागेसाठी ५ जानेवारी रोजी मतदान झाले आणि सोमवारी मतमोजणी झाली.
निवडणूक विभागाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, काँग्रेस उमेदवार रुपिंदर सिंह यांना ९४,९५० मते मिळाली, तर टीटी यांना ८३,६६७ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकावर असलेले आम आदमी पक्षाचे उमेदवार पिराथीपाल सिंग यांना ११,९४० मते मिळाली. या विजयासह २०० जागांच्या विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांची संख्या ७० झाली आहे. राज्यात सत्ताधारी भाजपचे ११५ आमदार आहेत.
भाजपने सुरेंद्रपाल सिंह टीटी यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने कुन्नर यांचे पुत्र रुपिंदर सिंह यांना तिकीट दिले. सत्ताधारी भाजपने ३० डिसेंबर रोजी करणपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे टीटी यांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून मंत्रिमंडळात समाविष्ट केले होते.