राजस्थानमधील झालवाड जिल्ह्यातील जेताखेडी गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पती-पत्नीने त्यांच्या दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. एकाच कुटुंबातील चार व्यक्तींनी एकाच वेळी मृत्यला कवटाळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची ओळख ही नागू सिंह, त्यांची पत्नी संतोष बाई, मुलगा युवराज सिंह आणि ३ वर्षांचा मुलगा अशी पटली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमागचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मृत कुटुंबामध्ये कुठलीही समस्या नव्हती. मात्र अचानक असा प्रकार घडल्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांना धक्का बसला आहे.
पोलीस आता या घटनेचा सखोल तपास करत आहेत. तसेच या कुटुंबाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून प्रत्येक पैलूवर बारकाईनं लक्ष दिलं जात आहे. तसेच कुटुंबाची पार्श्वभूमी आणि त्यांची सध्याची परिस्थिती यांचीही माहिती घेतली जात आहे, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.