देशातील ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांचा प्रचार चांगलाच जोर धरत आहे. त्यात, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने तगड्या नेत्यांची फौज प्रचाराच्या मैदानात उतरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याही सभा दोन्ही राज्यात होणार आहेत. तत्पूर्वी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानमध्ये सभा घेऊन अशोक गेहलोत सरकारवर निशाणा साधला. तसेच, काँग्रेसमध्ये लांगुलचालन पद्धती असल्याचे सांगत काँग्रेस नेत्यांवरही प्रहार केला. यावेळी, राजस्थानमधील कन्हैय्यालाल हत्याप्रकरणावर भाष्य करताना थेट युपीतील उदाहरणही दिलं.
योगी आदित्यनाथ राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी अलवरा जिल्ह्यातील तिजारा मतदारसंघात भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतली. येथील संभेत संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लबोल केला. तसेच, उदयपूरमधील कन्हैय्यालाल हत्याप्रकरणी भाष्य करताना उत्तर प्रदेशचं उदाहरण दिलं. तुम्हाला माहिती आहे की, कन्हैय्यालालची हत्या कशी झाली? तुम्हाला हेही माहिती आहे की, जर अशी घटना उत्तर प्रदेशात घडली असती तर काय झालं असतं?, असे म्हणत योगींनी युपीतील एन्काऊंटरच्या घटनांवर अप्रत्यक्षपणे लक्ष वेधलं.
राजस्थान राज्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. मात्र, ह्या इतिहासाला कंलक लावण्याचं काम काँग्रेसकडून होत आहे. देशातील काश्मीरची समस्याही काँग्रेसमुळेच निर्माण झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून समस्या सोडवली, त्यामुळे दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं. आता दहशतवाद कायमचा समाप्त झाला आहे, असे योगींनी म्हटले. योगींनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराबद्दलही भाष्य केलं. काँग्रेसने राम मंदिराच्या मुद्द्यावरील वादावर कधीच तोडगा काढला नाही. मात्र, मोदी आणि योगी येताच अयोध्येतील राम मंदिराचा मुद्द्यावरही समाधान झालं, असे योगींनी म्हटले.
देशातील डबल इंजिन सरकारकडून नागरिकांना समाधान मिळत आहे. भाजपच्या डबल इंजिन सरकारमुळेच सर्वच राज्यात प्रभावीपणे काम मार्गी लागत असून नागरिकांचे प्रश्न सोडवले जात आहेत, असे म्हणत योगींनी उत्तर प्रदेशातील नागरिकांना सरकारच्यावतीने देण्यात आलेल्या विविध योजनांची आणि लाभार्थ्यांच्या संख्येची माहितीही दिली.