'तुम्ही राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करा'; कमलनाथ यांना हायकमांडचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 08:39 AM2023-12-06T08:39:40+5:302023-12-06T08:41:01+5:30

कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.

Kamal Nath meets Mallikarjun Kharge, Rahul Gandhi after drubbing in MP polls; asked to step down as state chief | 'तुम्ही राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करा'; कमलनाथ यांना हायकमांडचे निर्देश

'तुम्ही राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करा'; कमलनाथ यांना हायकमांडचे निर्देश

नवी दिल्ली: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर दिल्लीत पोहोचलेल्या कमलनाथ यांनी मंगळवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. मंगळवारी संध्याकाळी ७.३० वाजता दिल्लीतील खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला काँग्रेसचे सरचिटणीस (संघटन) केसी वेणुगोपालही उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले. 

काँग्रेस पक्षाच्या हायकमांडने कमलनाथ यांना मध्य प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा देऊन नवीन प्रदेशाध्यक्षाची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री कमलनाथ काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा कधीही राजीनामा देऊ शकतात, असे सांगितले आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत २०२३मध्ये, भाजपाने १६३ जागांसह पूर्ण बहुमत मिळवले, तर काँग्रेस ६६ जागांसह दुसऱ्या स्थानावर आहे. 

१७ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशात एकूण २३० विधानसभेच्या जागांसाठी मतदान झाले आणि छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या तीन राज्यांसह रविवारी निकाल जाहीर करण्यात आला. काँग्रेसच्या पराभवानंतर रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कमलनाथ म्हणाले होते की, आम्हाला मध्य प्रदेशच्या मतदारांचा जनादेश मान्य आहे. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका बजावू. कमलनाथ यांनीही भाजपाच्या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि भाजपा राज्यातील जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडेल अशी आशा कमलनाथ यांनी व्यक्त केली.

कमलनाथ यांनी मंगळवारी भोपाळमधील मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित आमदार आणि पदाधिकाऱ्यांसोबत निवडणूक निकालांवर आढावा बैठक घेतली. त्यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, उमेदवार आणि आमदारांनी दिलेल्या प्राथमिक अहवालावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असून लवकरच सर्व उमेदवार मला सविस्तर अहवाल देतील. या पराभवातून धडा घेत, उणिवा दूर करत आजपासूनच लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करत आहोत. कोणताही पराभव धैर्याला हरवू शकत नाही, असं कमलनाथ यांनी सर्व विजयी आणि पराभूत झालेल्या आमदारांना सांगितले. 

त्यांना पक्षातून काढून टाका-

सुरेंद्र सिंह उर्फ ​​शेरा भैय्याने ठणकावून सांगितले की, नुकसान करणाऱ्यांना पहिली संधी मिळताच हटवले पाहिजे. कोणी कितीही प्रिय असो. पक्षाचा पराभव कोणी केला असेल किंवा ज्या पदाधिकाऱ्याच्या बूथमधून आम्ही पराभूत झालो, त्यांना तत्काळ पक्षातून काढून टाकावे, असे ते म्हणाले. शेरा यांनी हे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणाले की, मला काही बोलायचे नाही, पण पक्षाने यावर तातडीने पावले उचलावीत, अशी माझी विनंती आहे.

Web Title: Kamal Nath meets Mallikarjun Kharge, Rahul Gandhi after drubbing in MP polls; asked to step down as state chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.