जयपूर - श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राजस्थानात खळबळ उडाली आहे. सुखदेव सिंह गोगामेडी हे आपल्या निवासस्थानी असताना तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी गोगामेडी यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. या हल्ल्यात गोगामेडी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या हत्येचे राजस्थानात पडसाद उमटत असून आज राज्यव्यापी बंदही पुकारण्यात आला आहे. त्यांच्या समर्थकांकडून आंदोलने सुरू आहेत. याप्रकरणी गोगामेडी यांच्या पत्नीने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आता, वडिलांच्या निधनानंतर मुलीने करणी सेना सांभाळणार असल्याचं म्हटलंय.
गोगामेडी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. गोगामेडी यांच्या कुटुंबीयांचा दु:ख पाहून अनेकांचे डोळे पाणावले. तर, सुखदेव यांच्या कन्येनं या दु:खातही स्वत:ला सावरत वडिलांची सेना पुढे नेणार असल्याचं सांगितलं. गोगामेडीच्या लेकीच्या या शब्दांनी अनेकांना स्फुर्ती दिली, तर भावनिका होऊन काहींचे डोळेही पाणावले. आता, चारही बाजुला पोलीसच पोलीस आहेत, पण हीच पोलिसांची सुरक्षा अगोदर दिली असती तर माझ्या वडिलांचा खून झाला नसता, असेही उर्वशीने म्हटले.
उर्वशी वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदाच मीडियासमोर आली. यावेळी, तिने वडिलांच्या निधनावर राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाला लक्ष्य केलं. तसेच, समर्थकांना धीर देत मी अर्ध्या रात्रीची या आंदोलनात सहभागी होण्यासाठी तयार आहे. माझ्या माता-भगिनींना, भावांना माझी गरज असल्यास मी सदैव तुमच्यासाठी हजर राहिल, असेही उर्वशीने म्हटले. माझ्या वडिलांच्या हत्यारांना वाटत असेल वडिलांची हत्या केली म्हणजे आमचं कुटुंब दबून जाईल. पण, सुरमा कभी मरता नही, अमर होता है.... मला सर्वांची साथ मिळाल्यास मीही राजकारणा येईल. वडिलांनी उभारलेली करणी सेना पुढे चालवेन, असेही उर्वशीने अंत्यसंस्कारस्थळी बोलताना म्हटले.
दरम्यान, करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर हल्ला होऊ शकतो, अशी माहिती पंजाब पोलिसांनी आठ महिन्यांपूर्वीच राजस्थान पोलिसांना दिली होती. मात्र राजस्थान पोलिसांनी हा इशारा गांभीर्याने घेतला नसल्याचं मंगळवारी घडलेल्या घटनेतून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी अद्याप खुलासा केला नसून ते नेमकं काय स्पष्टीकरण देतात, हे पाहावं लागेल.
हल्लेखोरांना अटक
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची त्यांच्याच निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन मारेकरी लग्नपत्रिका देण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी आले होते. सुरुवातीला हल्लेखोरांनी सोफ्यावर बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि थोड्याच वेळात अचानक त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं. प्रत्युत्तरादाखल गोगामेडी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक मारेकरी मारला गेला. तसंच दोन आरोपींनी तिथून पळ काढला.
दरम्यान, सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. रोहित राठोड असे एका आरोपीचे नाव असून तो नागौरमधील मकराना येथील रहिवासी आहे. तसंच या प्रकरणातील दुसरा आरोपी नितीन फौजी हा हरियाणातील महेंद्रगडचा रहिवासी आहे.