जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात चाकू हल्ला करणाऱ्या आरोपी नसीब चौधरीवर प्रशासनाने कडक कारवाई केली आहे. प्रशासनाने बेकायदेशीर बांधलेले आरोपीचे घर बुलडोझरने जमीनदोस्त केले. बेकायदेशीर बांधकामावर बुलडोझर कारवाई सुरू असताना अनेकांनी जय श्री रामच्या घोषणाही दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महादेव मंदिरात बासुंधी वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नसीब चौधरी आणि त्याचा मुलगा भीष्म चौधरी तिथे आले आणि त्यांनी दुधाचे पातेले लाथ मारुन पाडले. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांसोबत बाचाबाची करत चाकूने हल्ला केला. या घटनेत 8-10 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना सवाई मानसिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेमुळे संतप्त झालेल्या काही लोकांनी दिल्ली-अजमेर राष्ट्रीय महामार्ग काही काळ रोखून धरला. मात्र, रात्री उशिरा त्यांनी आंदोलन मागे घेतले. या प्रकरणाची माहिती मिळताच राजस्थान सरकारचे कॅबिनेट मंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी तातडीने रुग्णालयात पोहोचून जखमींची भेट घेतली. आरोपींना सोडले जाणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, या घटनेनंतर जयपूर विकास प्राधिकरणाने (जेडीए) नसीब चौधरी याच्या बेकायदा बांधकामाविरोधात अतिक्रमणप्रकरणी नोटीस बजावली होती. नसीब चौधरीने त्याच्या घराजवळील मंदिराच्या जागेवर बेकायदेशीर खोली बांधल्याचा आरोप आहे. त्यानंतर आता आज(20 ऑक्टोबर 2024) जेडीएने बेकायदा बांधकामावर बुलडोझर चालवला.
पोलीस आयुक्त काय म्हणाले?या प्रकरणाची माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त राष्ट्रदीप यांनी सांगितले की, काल (गुरुवारी) एका मंदिरात जागरण आणि प्रसाद वाटपाचा कार्यक्रम सुरू होता. तिथे काही लोक शांततेत कार्यक्रमाचे आयोजन करत होते. त्या मंदिराशेजारी नसीब चौधरी नावाच्या व्यक्तीचे कुटुंब राहते, ज्यांच्यावर यापूर्वी काही गुन्हे नोंद आहेत. तो आणि त्याचा मुलगा मंदिरात आला आणि काही लोकांवर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर दोन्ही आरोपींना रात्रीच अटक करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. यात आणखी कोणाचा हात असेल तर त्याचीही चौकशी केली जाईल. या घटनेत कोणताही जातीय वाद नाही, दोन्ही बाजूचे लोक हिंदूच आहेत.