Kota Mahashivratri News :राजस्थानच्या कोटामध्ये महाशिवरात्रीच्या पवित्रदिनी एक मोठी दुर्घटना घडली आहे. भगवान शंकराच्या मिरवणुकीत विजेचा धक्का लागल्याने सुमारे 14 मुले गंभीररित्या भाजली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कुन्हडी थर्मल चौकाजवळ ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि स्थानिकांनी तात्काळ जखमी मुलांना घेऊन हॉस्पिटल गाठले. अपघाताची माहिती जखमी मुलांच्या नातेवाईकांना समजताच त्यांनीदेखील रुग्णालयाकडे धाव घेतली.
सर्व जखमी मुलांना उपचारासाठी एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि ऊर्जा मंत्री हिरालाल नागर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी मुलांची भेट घेटली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमींपैकी एक मुलगा 70 टक्के, तर दुसरा 50 टक्के भाजला आहे. उर्वरित मुले 10-15 टक्के भाजली आहेत. सर्वांचे वय 9 ते 16 वर्षे दरम्यान आहे. आयोजकांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कोटा एसपी अमृता धवन यांनी सांगितले की, ही घटना दुपारी 12.30 च्या सुमारास घडली. भगवान शंकराच्या मिरवणुकीत अनेक लोक जमले होते, त्यात 20-25 लहान मुले आणि महिला-पुरुषांचा समावेश होता. यामध्ये एका मुलाच्या हातात 20 ते 22 फूट लांबीचा लोखंडी पाईप होता, जो वर हाय टेंशन वायरला चिटकल्याने विद्युत प्रवाह पसरला आणि तिथे उपस्थित असलेल्या इतर मुलांनाही विजेचा जोरदार धक्का लागून ते भाजले.
घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय पथकाला सतर्क करण्यात आले. त्यांना प्राधान्याने उपचार दिले जात असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, विजेचा झटका लागल्याची घटना घडल्यानंतर जखमी मुलांच्या संतप्त कुटुंबीयांनी आयोजकांवर निष्काळजीपणाचा आरोप करत त्यांना जोरदार मारहाण केली. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.