वय २५, उच्च शिक्षित, लोकसभेची उमेदवारी; पायलट यांचा रेकॉर्ड मोडणार? कोण आहेत संजना जाटव?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 01:59 PM2024-03-13T13:59:55+5:302024-03-13T14:06:43+5:30

Rajasthan Lok Sabha Election 2024 Politics: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वांत तरुण नेत्यावर पक्षाने विश्वास दाखवल्याचे सांगितले जात आहे.

lok sabha election 2024 congress sanjana jatav youngest candidate from bharatpur constituency | वय २५, उच्च शिक्षित, लोकसभेची उमेदवारी; पायलट यांचा रेकॉर्ड मोडणार? कोण आहेत संजना जाटव?

वय २५, उच्च शिक्षित, लोकसभेची उमेदवारी; पायलट यांचा रेकॉर्ड मोडणार? कोण आहेत संजना जाटव?

Rajasthan Lok Sabha Election 2024 Politics: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसकडून दुसरी उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. तसेच भाजपाची दुसरी यादी कधीही जाहीर होऊ शकते, असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जात आहे. अशातच एका युवा नेत्यावर पक्षाने विश्वास दाखवत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमवण्याची संधी दिली आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यास काँग्रेस नेते सचिन पायलट यांचा सर्वांत तरुण खासदार असल्याचा रेकॉर्ड मोडला जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसने राजस्थानमधील १० जणांना लोकसभा उमेदवारी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत या १० जणांची नावे घोषित करण्यात आली. यामध्ये तरुण आणि अनुभवी १० जणांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्वांमध्ये सर्वात आश्चर्यकारक नाव आहे ते भरतपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजना जाटव यांचे. संजना जाटव यांचे वय केवळ २५ वर्षे आहे. राजस्थानसाठी आतापर्यंत घोषित केलेल्या काँग्रेस उमेदवारांपैकी सर्वांत तरुण उमेदवार आहेत. 

सचिन पायलट यांचा विक्रम मोडणार?

संजना जाटव यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या नावावर असलेल्या विक्रमाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. सचिन पायलट यांनी २००४ मध्ये दौसा मतदारसंघातून कारकिर्दीतील पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती. तेव्हा सचिन पायलट यांचे वय २६ वर्षे होते. ही निवडणूक जिंकून ते लोकसभेतील सर्वांत तरुण खासदार ठरले. राजस्थानात आजही सर्वांत तरुण खासदार होण्याचा मान सचिन पायलट यांनाच आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत संजना जाटव विजयी झाल्या तर सर्वांत कमी वयात निवडणूक जिंकण्याचा सचिन पायलटचा विक्रम त्या मोडू शकतात, असे म्हटले जात आहे. 

गत विधानसभा निवडणुकीत ४०९ मतांनी पराभव

संजना जाटव यांचा जन्म मे १९९८ मध्ये झाला असून, त्यांचे वकिलीचे शिक्षण झाले आहे. अलवर येथून त्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आहेत. विशेष म्हणजे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने चार वेळा आमदार बाबुलाल बैरवा यांचे तिकीट कापले होते आणि संजना जाटव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, भाजपा उमेदवार रमेश खिंची यांच्याकडून संजना जाटव यांचा अवघ्या ४०९ मतांनी पराभव झाला होता. 

दरम्यान, संजना जाटव या प्रियांका गांधी यांच्या 'लड़की हूं, लड़ सकती हूं' या मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. त्यामुळेच संजना जाटव यांच्यावर पुन्हा एकदा पक्षाने विश्वास दाखवला असल्याची चर्चा आहे. या लोकसभा मतदारसंघासाठी अनेक बडे नेते उमेदवारीच्या शर्यतीत होते. मात्र, सर्वांना डावलून संजना जाटव यांचे नाव घोषित झाले. राजस्थानमध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. त्यामुळेच यावेळी कार्यकर्त्यांचा अभिप्राय घेऊन उमेदवारी दिली जात आहेत.
 

Web Title: lok sabha election 2024 congress sanjana jatav youngest candidate from bharatpur constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.