26 वर्षीय तरुणाने उडवली भाजपची झोप; प्रचारासाठी CM योगी अन् बागेश्वर बाबाची पडली गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2024 09:45 PM2024-04-08T21:45:02+5:302024-04-08T21:46:38+5:30
बाडटमेर-जैसलमेर लोकसभा जागेवर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या रवींद्र भाटींविरोधात भाजपने बड्या-बड्या नेत्यांची फौज उभी केली आहे.
Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत राजस्थानमधील बारमेर-जैसलमेर लोकसभा जागेवरील लढत रंजक बनली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचे टार्गेट ठेवले आहे. यासाठी पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. पण, मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या भाजपची एका 26 वर्षीय तरुणाने झोप उडवली आहे. राजस्थानच्या बारमेर-जैसलमेर लोकसभा जागेसाठी रवींद्रसिंह भाटी यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. अर्ज दाखल करण्यासाठी त्यांनी काढेलेल्या रॅलीमुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. त्यांच्या रॅलीत इतकी गर्दी जमली की, भाजपसोबत काँग्रेसचीही झोप उडाली. यामुळेच आता या जागेवर प्रचार करण्यासाठी भाजपने अनेक बड्या नेत्यांची फौज उभी केली आहे.
बाडमेर-जैसलमेर लोकसभा जागेवर भाजपने कैलाश चौधरी यांना, तर काँग्रेसने उमेदाराम बेनिवाल यांना तिकीट दिले आहे. 2019 मध्ये भाजपने लोकसभेच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. यंदाही भाजपला आपला ट्रॅक रेकॉर्ड कायम ठेवायचा आहे. मात्र, पंतप्रधान मोदींच्या विचारांनी प्रभावित असलेले 26 वर्षीय रवींद्रसिंह भाटी यांनी भाजपला तगडे आव्हान दिले आहे. अपक्ष आमदार रवींद्र भाटी या भागातील लोकप्रिय नेते असल्यामुळे भाजपने त्यांच्यासमोर अनेक बड्या नेत्यांना प्रचारासाठी पाठवले आहे.
योगी आदित्यनाथ ते बाबा बागेश्वर यांच्या सभा
काँग्रेसचे उमेदवार उमेदाराम बेनिवाल यांच्या रॅलीतदेखील प्रचंड गर्दी जमली होती. एकीकडे काँग्रेसचे आव्हान, तर दुसरीकडे रवींद्र भाटी यांना मिळणारा पाठिंबा, यामुळे भाजपची झोप उडाली आहे. त्यामुळेच आता यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह बाबा बागेश्वर बारमेर-जैसलमेर लोकसभा जागेवर भाजपचा प्रचार करणार आहेत. या मतदारसंघात अनेक फायर ब्रँड नेत्यांचा मेळावा घेण्याचेही भाजपने ठरवले आहे.
कोण आहेत रवींद्र भाटी?
26 वर्षीय रवींद्रसिंह भाटी यांनी 4 महिन्यांपूर्वी झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत शिव मतदारसंघातून अपक्ष विजय मिळवला होता. ते पीएम मोदी आणि भाजपचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळेच त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारीची मागणी केली होती. पण, पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवला. भाटी यांनी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. आता त्यांनी थेट लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजप-काँग्रेसचे टेंशन वाढले आहे.