उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजस्थानात बोलताना इस्रायलने हमासला दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक केले आहे. त्यांनी काँग्रेसवरही लांगूलचालनाच्या राजकारणाचा आरोप केला. या शिवाय, उत्तर प्रदेशात होत असलेल्या बुलडोझर अँक्शनचाही उल्लेख केला. तसेच, तालिबानी मानसिकतेचा पराभव होईल आणि राष्ट्रवादाचा विजय होईल, असेही योगी यांनी म्हटले आहे. ते खासदार बाबा बालक नाथ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तिजारा येथे पोहोचले होते.
योगी आदित्यनाथ म्हणाले, 'मला सांगण्यात आले आहे की, काँग्रेसने तिजारा विधानसभा मतदारसंघात ज्या व्यक्तीला पाठवले आहे. ती स्वत:बद्दल मोठ-मोठ्या उपमा लावते. बजरगंबलींची गदा हाच तालिबानवरील उपचार आहे. आपण बघत आहात ना, सध्या इस्रायल गाझातील तालिबानी मानसिकता कशा पद्धतीने चिरडण्याचे काम करत आहे. अचून निशाणा मारत.' महत्वाची गोष्ट म्हणजे, काँग्रेसने बाबा बालक नाथ यांच्या विरोधात तिजारा येथून मुस्लीम उमेदवार इम्रान खान यांना तिकीट दिले आहे.
योगी म्हणाले, "अराजकता, गुंडगिरी आणि दहशतवाद हा सुसंस्कृत समाजासाठी सर्वात मोठा कलंक आहे. मात्र, व्होटबँकेचे राजकारण जेव्हा दहशतवाद, गुंडगिरी आणि अराजकतेसोबत जोडले जाते, तेव्हा एक गरीब, एक निष्पाप, महिला, व्यापारी आणि संपूर्ण सुसंस्कृत समाजाला दोका निर्माण होतो. एवढेच नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून योगींनी गेहलोत सरकारला कोंडीत पकडले आणि पंतप्रधान मोदींच्या कामाचे कौतुक केले.
...अन् काश्मीर आणि अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सुटला -राजस्थान राज्याचा एक गौरवशाली इतिहास आहे. मात्र, ह्या इतिहासाला कंलक लावण्याचे काम काँग्रेसकडून होत आहे. देशातील काश्मीरची समस्याही काँग्रेसमुळेच निर्माण झाली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० हटवून समस्या सोडवली. यामुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले. आता दहशतवाद कायमचा नष्ट झाला आहे, असे योगींनी म्हटले. योगींनी यावेळी अयोध्येतील राम मंदिराबद्दलही भाष्य केले. काँग्रेसने राम मंदिराच्या मुद्द्यावरील वादावर कधीच तोडगा काढला नाही. मात्र, मोदी आणि योगी येताच अयोध्येतील राम मंदिराचा मुद्द्यावरही सुटला, असेही योगी यावेळी म्हटले.